भारत चव्हाण कोल्हापूर : कोल्हापूरच्या पर्यटनवृद्धीसाठी झटपट निर्णय घेऊन त्यांची अंमलबजावणी करण्याचे फर्मान सोडणाऱ्या पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या स्तरावर १३ कोटी खर्चाच्या भक्त निवासाची फाइल प्रलंबित असल्याची बाब समोर आली आहे. येथील गाडीअड्ड्याची जागा पूरबाधित क्षेत्रात येत असल्याने भक्त निवास ताराबाई रोडवरील बहुमजली पार्किंगच्या इमारतीत करण्याचा महापालिकेचा इरादा असून, त्यासाठीच्या फेरबदलाच्या फाइलला पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय समितीची मंजुरी आवश्यक आहे; परंतु त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही.नगरविकास विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनाने ७९ कोटी ९६ लाखांचा अंबाबाई मंदिर परिसर विकास आराखडा तयार केला असून, आराखड्यास प्रशासकीय तसेच तांत्रिक मंजुरीही मिळाली. पहिल्या टप्प्यात दर्शन मंडप उभारायचा होता; परंतु त्याला जागा उपलब्ध होण्यात अडचणी आल्याने त्याऐवजी बहुमजली पार्किंग इमारत बांधण्याचा निर्णय झाला. ९ कोटी ४१ लाख खर्चाची इमारत ताराबाई रोडवरील मोकळ्या जागेत उभारण्यात येत असून त्यावर सत्तर टक्के निधीही खर्च झाला आहे. काम मे २०२३ अखेर पूर्ण होणार आहे.दुसऱ्या टप्प्यात गाडीअड्डा येथील मोकळ्या जागेत भक्त निवास बांधायचे होते. दरम्यानच्या काळात २०१९ व २०२१ मध्ये महापूर आला आणि ही जागा पूरबाधित क्षेत्रात येत असल्याने तसेच रेड झोनमध्ये समाविष्ट झाल्याने तेथे भक्त निवास उभारण्यात अडचणी आल्या. त्यामुळे भक्त निवासची जागा बदलून ती ताराबाई रोडवरील बहुमजली पार्किंगच्या इमारतीत बांधण्याचे ठरले.
नगरविकास विभागाने मूळ आराखड्यात काही कारणांनी फेरबदल करायचा झाला तर त्याचे अधिकार पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय समितीला दिले आहेत. त्यामुळे महापालिका प्रशासनाने त्यासंबंधीची फाइल जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविली आहे; परंतु त्यावर अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही.
बहुमजली पार्किग, भक्त निवास इमारत सात मजल्यांचीभविष्यात भक्तनिवासही बहुमजली पार्किंगच्या इमारतीत करता यावे म्हणून इमारतीचा पाया सात मजले पेलण्याच्या क्षमतेचा बनविला आहे. सध्या पार्किंगसाठीची इमारत ही बेसमेंट, ग्राउंड फ्लोअर, पहिला व दुसरा मजला अशा रचनेची बनविली जात आहे. भक्त निवास येथे बांधायचे झाले तर तिसरा, चौथा व पाचवा मजला देखील पार्किंगसाठी ठेवून त्यावर सहाव्या व सातव्या मजल्यावर भक्त निवास केले जाणार आहे.असे असेल भक्तनिवासएकूण खोल्या - ४७डॉर्मेट्री : चार अटॅच बाथरूमसहकँटीनची सोय : २५० लोकांसाठी.भाविक राहण्याची क्षमता : एकावेळी २०० हून अधिक.पार्किंग व्यवस्था : आणखी तीन मजले पार्किंगसाठी उपलब्ध केल्याने मूळ इमारतीतील २३६ चारचाकींसह अतिरिक्त ९६ चारचाकी वाहने.