कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या अंबाबाई मंदिर संदर्भ ग्रंथालयासाठी शके १७८६ मधील दुर्मिळ हस्तलिखित स्वरुपातील गुरु चरित्र दाखल झाले आहे. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवडे यांनी ही माहिती दिली.करवीर निवासिनी अंबाबाई मंदिराचा इतिहास प्राचीन आहे. रोज लाखो भाविक येथे दर्शनासाठी येत असतात. अनेक भक्तांना मंदिराचा आणि शहराचा इतिहास आणि माहिती जाणून घेण्याची उत्सुकता असते. यामुळे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती अंबाबाई मंदिर संदर्भग्रंथालय उभा करत आहे. या ग्रंथालयासाठी शके १७८६ मधील हे हस्तलिखित गुरुचरित्र सर्मर्पित करण्यात आले असल्याची माहिती नाईकवडे यांनी दिली आहे.शके १७८६ मधील हे दुर्मिळ गुरूचारित्राचे हस्तलिखित आहे. ९ इंच बाय ४ इंच आकाराच्या या ग्रंथांची सहाशे ते आठशे पाने हस्तलिखित स्वरुपात आणि चांगल्या अवस्थेत आहेत. या हस्तलिखितातील मजकूर हाताने तयार केलेल्या जुन्या काळातील कागदावर नैसर्गिक शाईपासून लिहिलेला आहे. हा ग्रंथ कोल्हापूरातील करवीर निवासिनीचे भक्त जगदीश गुळवणी यांनी श्रीचरणी अर्पण केला आहे.प्राकृत भाषेतील हा ओवीबध्द ग्रंथ नृसिंह गुरुचरित्र असून हस्तलिखित स्वरुपातील असल्यामुळे तो दुर्मिळ आहे. गाणगापूर, नृरसिंहवाडी तसेच कारंजा येथील मध्ययुगीन कालखंडातील दत्त विभूती महाराज यांचे हे गुरुचरित्र असल्याचे देवस्थानचे सहाय्यक व्यवस्थापक आणि धार्मिक विभागाचे मार्गदर्शक गणेश नेर्लेकर-देसाई यांनी सांगितले. अशा हस्तलिखित ग्रंथांचा संदर्भांसाठी वापर करत पुस्तक निर्माण केले जात होते, असेही त्यांनी सांगितले आहे. या संदर्भ ग्रंथालयासाठी देवस्थापन समितीकडून वेद, वेदांग, वेदांत, नीतीशास्त्र, धर्मशास्त्र, शिवशास्त्र, शक्तिआगम आदी धर्मग्रंथ मागविण्यात आले आहेत.
अशाप्रकारचे धर्मविषयक आणखी दुर्मिळ संदर्भग्रंथ किंवा हस्तलिखित भाविकांकडे असतील तर ते मंदिराच्या ग्रंथालयासाठी द्यावेत. - शिवराज नाईकवडे, सचिव, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती.