कोल्हापूर : आई अंबाबाई सरकारने आमची घरं दारं जमिनी काढून घेतल्या, ते परत देण्याची आणि आमच्या प्रश्नांकडे लक्ष देण्याची सरकारला बुद्धी दे असे साकडे मंगळवारी चांदोली अभयारण्यग्रस्तांनी देवीला घातले. गेल्या २० वर्षांपासून पूर्नवसनाकडे डोळे लावून बसलेल्या महिलांनी सरकार डोळे उघडायला तयार नाही आता तु तरी आमच्याकडे बघ अशी साद घातली.श्रमिक मुक्ती दलाच्यावतीने जिल्ह्यातील चांदोली अभयारण्यग्रस्त व वारणा धरणग्रस्त नागरिकांचे गेल्या १५ दिवसांपासून आपल्या न्याय्य हक्काच्या मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरू आहे. या मागण्यांबाबत मुख्यमंत्ऱ्यांसोबत बैठक व्हावी अशी त्यांची मागणी आहे. मात्र शासन पातळीवर या आंदोलनाची कोणतिही दखल घेण्यात आलेली नाही अथवा त्याची आंदोलकांना माहिती दिलेली नाही. त्यामुळे आंदोलनाचा पुढचा टप्पा आणि आता देवीने तरी सरकारला बुद्धी द्यावी यासाठी अंबाबाईपुढे साकडे घालण्याचा निर्णय घेण्यात आला.मंगळवारी सकाळी दहा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयापासून आंदोलकांनी पायी अंबाबाई मंदिरापर्यंतचे अंतर कापले. अकरा वाजता प्रकल्पग्रस्त महिला मंदिरात गेल्याव व आमची घरं दार व शेतजमिनी परत देण्याची सरकारला बुद्धी दे असे देवीला साकडे घातले. यावेळी दोनशेहून अदिक प्रकल्पग्रस्त उपस्थित होते. साकडे घातल्यानंतर राज्य कार्यालय प्रमुख संपत देसाई यांनी आपल्या मागण्या मान्य होईपर्यंत हा लढा सुरूच ठेवणार असल्याचा निर्धार व्यक्त केला.