कोल्हापूर : करवीरनिवासिनी श्री अंबाबाई मूर्तीवरील रासायनिक संवर्धन प्रक्रियेत गायब करण्यात आलेल्या नागचिन्हाबाबत निर्णय घेण्यासाठी समिती स्थापन करण्याची जिल्हाधिकाऱ्यांची घोषणा हवेतच विरली आहे. संवर्धन प्रक्रिया सुरू असताना करण्यात आलेले छायाचित्रण, छायाचित्रे हा सगळा अहवाल गुप्त ठेवण्यात आला आहे. हे प्रकरण रेंगाळत ठेवून जिल्हाधिकारी, देवस्थान आणि पुजारी अळीमिळी गूपचिळीची भूमिका घेत हा विषय भक्तांच्या विस्मृतीत जाण्याचीच जणू वाट पाहत आहेत. श्रीपूजकांच्या पुढाकाराने जुलै २०१६ मध्ये अंबाबाई मूर्तीच्या रासायनिक संवर्धनाची प्रक्रिया सुरू झाली तेव्हा कोल्हापूरकरांना अतिव आनंद झाला. आता देवीची मूर्ती पूर्ववत होणार, हा आनंद औटघटकेचा ठरवीत नागचिन्हाशिवाय घडविलेल्या मूर्तीसमोरचा पडदा उघडला. देवीचे मूळ स्वरूप बदलण्यात आले. यावर पुजाऱ्यांनी मूर्तीवर नाग नव्हताच, असे सांगितले. जाताना पुरातत्त्वच्या अधिकाऱ्यांनी पुजाऱ्यांवर ठपका ठेवला. उंबऱ्याच्या आतला भाग पुजाऱ्यांकडे म्हणतच समितीने अंग काढून घेतले.धार्मिक संस्था, संघटनांनी आंदोलन व निवेदन दिल्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी अभ्यास समिती स्थापन करण्याचे जाहीर केले होते. दीड वर्षे लोटले तरी ही घोषणा हवेतच आहे. पुजारी आता आमचा काही संबंध नाही, अशा आविर्भावात आहे. हा सगळा प्रकार म्हणजे देवीच्या मूलतत्त्वाशी आणि भावनांशी चालविलेला खेळ आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया भक्तांनी व्यक्त केली.सीडीची गुप्ततामूर्ती संवर्धनाच्या प्रक्रियेची छायाचित्रे आणि छायाचित्रण करण्यात आले आहे व त्याची सीडी देवस्थान समितीला देण्यात आली आहे. ही सीडी तज्ज्ञांपैकी एकाने जरी पाहिली असती तरी त्यातील महत्त्वाची माहिती पुढे आली असती. मात्र, एकाही पदाधिकाऱ्याला सीडी दाखविण्यात आलेली नाही. त्यातील बाबी जनतेपुढे आणल्या गेल्या नाही. जे आहे ते खरं जनतेसमोर आले तर त्यातून काही मार्ग निघाला असता याबाबत जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी फोन उचलला नाही त्यामुळे त्यांची प्रतिक्रिया समजू शकली नाही. वेळकाढूपणा..देवीच्या पूर्वीच्या छायाचित्रांमध्ये, वर्णनांमध्ये, धार्मिक ग्रंथांमध्ये, आरतीमध्ये, मंत्रांमध्ये शीलालेखांवर कोरण्यात आलेल्या वर्णनात नागचिन्हाचा उल्लेख आहे. मात्र, मूर्तीची झीज इतकी झाली होती की सगळी चिन्हे, अलंकार, कोरीव काम लुप्त झाले होते. नागचिन्हाबाबत नियमानुसार त्याचवेळी तज्ज्ञांची अभ्यास समिती स्थापन केली असली तर आतापर्यंत त्यांचा अहवाल येऊन कदाचित मूर्तीवर नागचिन्ह पुन्हा कोरले गेले असते; पण असे करण्याइतकी संवेदनशीलता दाखविली गेली नाही. आर्द्रतेचे किती नियम पाळले? मूर्तीच्या संवर्धनासाठी स्थापन झालेल्या आर्द्रता समितीने केलेली पाण्याचा साठा बंद करण्याची सूचना सोडली तर अन्य किती सूचना अंमलात आणल्या गेल्या हाही प्रश्नच आहे. रोज देवीच्या पूजेचा इव्हेंट होतो, ढीगभर पाणी मारलेली फुले गाभाऱ्यात जातात आणि मंदिरातील नैसर्गिक झरोखे खुले करणे व नवीन खिडक्या बसविणे, संगमरवरी फरशी, बाह्य परिसरातील पत्रे, तापमान वाढविणाऱ्या धातूच्या वस्तू काढून टाकणे यासाठी देवस्थानला मुहूर्तच सापडेनासा झालाय.
अंबाबाई मूर्तीवरील नागचिन्हावर अळीमिळी...
By admin | Published: February 10, 2017 12:53 AM