कोल्हापूर : अंबाबाई मंदिराच्या आराखड्यास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक हजार कोटी रुपयांचा निधी देण्याचे मान्य केले आहे. त्यामुळे येत्या काळात अंबाबाई असेल, जोतिबा असेल, नृसिंहवाडीचा आराखडा पूर्ण करू शकलो तर आज येणाऱ्या भाविकांच्या संख्येत दहा पटींनी वाढ होईल, अशी अपेक्षा आहे. त्यामुळे या तिन्ही देवस्थानांचे आराखडे पूर्ण करून कोल्हापूरला देशातील ‘नंबर वन’चे तीर्थक्षेत्र व पर्यटन क्षेत्र बनविण्याचा निर्धार पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी येथे बोलताना व्यक्त केला.महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियानाअंतर्गत कोल्हापूर शहरातील शंभर कोटींच्या रस्ते विकास प्रकल्पाचा उद्घाटनप्रसंगी पालकमंत्री मुश्रीफ बोलत होते. याप्रसंगी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, आमदार जयश्री जाधव यांच्यासह सर्वपक्षीय कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.मुश्रीफ म्हणाले, अंबाबाई मंदिर विकास आराखड्याची अंमलबजावणी करताना सर्व संबंधित घटकांना विश्वासात घेऊन त्यांना योग्य मोबदला देऊन कामाला सुरुवात केली जाईल, यासंदर्भात लवकरच व्यापारीवर्गाची बैठक घेतली जाईल. अयोध्या, महाकाल, उज्जैन या तीर्थक्षेत्रांचा विकास झाल्यानंतर तेथील पर्यटन दहा पटींनी वाढले आहे. त्यामुळे कोल्हापूरच्या देवस्थानचा विकासही याच धर्तीवर करण्याचा आमचा विचार आहे.
आयआरबी रस्ते दुरुस्तीसाठीचा ९० कोटी, रस्ते विकास प्रकल्पातील वगळलेल्या ८४ पैकी ६५ रस्त्यांचा १६५ कोटींचा निधी मंजूर करून आणण्यास मी तसेच राजेश क्षीरसागर प्रयत्न करणार आहे. हद्दवाढ, घनकचरा प्रकल्प यासह कोल्हापूरच्या अनेक प्रश्नांची सोडवणूक करून त्यातून कोल्हापूरकरांना मुक्ती कशी मिळेल, यादृष्टीने प्रयत्न असतील, असे मुश्रीफ यांनी सांगितले.थेट पाइपलाइनचे लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्तेथेट पाइपलाइनचे पाणी अजून सर्व शहरातील नागरिकांना मिळालेले नाही. येत्या आठ ते दहा दिवसांत ते सर्वांना मिळेल, एकाच वेळी सर्व नागरिकांना पाणी मिळायला सुरू झाले की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जाहीर समारंभाद्वारे या योजनेचे लोकार्पण करण्यात येणार असल्याचे मुश्रीफ यांनी जाहीर केले.शहर अभियंता हर्षजीत घाटगे यांनी रस्ते प्रकल्पाची माहिती दिली. अतिरिक्त आयुक्त केशव जाधव यांनी स्वागत केले. रविकांत आडसूळ यांनी आभार मानले. यावेळी सत्यजीत कदम, आदिल फरास, राजेश लाटकर, सुजीत चव्हाण, राहुल चिकोडे, विजय जाधव, महेश जाधव, विलास वास्कर उपस्थित होते.
मंडलिक, माने हेच महायुतीचे उमेदवार लोकसभेच्या कोल्हापूर मतदार संघातून खासदार संजय मंडलिक तर हातकणंगले मतदार संघातून खासदार धैर्यशील माने हेच महायुतीचे उमेदवार असतील, असे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी स्पष्ट केले.
व्यापाऱ्यांना चांगला मोबदलाअंबाबाई मंदिर परिसरातील व्यापाऱ्यांनी आहे त्याच जागी पुनर्वसन करण्यात यावे, अशी मागणी केली असल्याकडे लक्ष वेधले असता, मुश्रीफ यांनी सांगितले की, जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना चांगला मोबदला देण्याची तयारी दर्शविली आहे. जागा संपादन केल्याशिवाय तेथे येणाऱ्या भाविकांना चांगल्या सुविधा देता येणार नाहीत. विस्थापित होणाऱ्या व्यापाऱ्यांचे पुनर्वसन करण्याची सरकारची भूमिका आहे, ते कसे करायचे याचा निर्णय चर्चेनंतर घेतला जाईल.