कोल्हापूर : भालदार-चोपदार, रोषणनाईक असा लवाजमा, सनई-चौघड्यांचा मंजूळ सूर.. समोर सुरेख रांगोळीचा गालिचा आणि पानाफुलांनी सजलेल्या झोपाळ्यात निवांत बसून वैशाखात झुला घेत असलेली आई अंबाबाई...अशा मंगलमयी वर्षातील साडे तीन मुुहूर्तापैकी एक मुहूर्त असलेल्या अक्षय्य तृतियेनिमित्त शुक्रवारी करवीर निवासिनी श्री अंबाबाईची झोपाळ्यावरील मनोहारी पूजा बांधण्यात आली. कोरोनामुळे मंदिरात प्रवेश नसला तरी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीतर्फे करण्यात आलेल्या थेट प्रक्षेपणामुळे घरात बसूनच भाविकांनी देवीसमोर हात जोडले.उन्हाळ्याचे दिवस म्हणजे वैशाख वणवा,एकीकडे उन्हाने लाही लाही होत असतानाच बहरलेली वनराई, आंब्याचा गोडवा हा निसर्गाचा साज अंबाबाईच्या चरणी अर्पण करण्यासाठी दरवर्षी अक्षय्यतृतियेला गरुड मंडपात देवीची झोपाळ्यातील पूजा बांधली जाते.
मूळ मूर्तीच्या दुपारच्या पुजेनंतर पानाफुलांनी सजलेला झोपाळा, चांदीचे आसन आणि भरजरी शालूत अलंकारांनी सजलेल्या अंबाबाईची उत्सवमूर्ती या झोपाळ्यात विराजमान होते. चोपदार, रोषणनाईक असा लवाजमा देवीचा झुला झुलवत तिच्याचरणी सेवा अर्पण करतात. यावेळी देवीची ओटी भरण्यात आली. त्यानंतर जीवाला थंडावा देणाऱ्या पन्हं चे वाटप करण्यात आले.कोरोनामुळे सलग दुसऱ्यावर्षी भाविकांनी अंबाबाईच्या या पूजेचा, प्रत्यक्ष दर्शनाचा लाभ घेता आलेला नाही. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्यावतीने फेसबुक, युट्युब, इन्स्टाग्राम तसेच अंबाबाई लाईव्ह दर्शन ॲपच्या माध्यमातून या सोहळ्याचे थेट प्रक्षेपण करण्यात आले. रात्री साडे आठ वाजता, देवीची आरती झाली, रात्री साडेनऊ वाजता पालखीने या सोहळ्याची सांगता झाली.