कोल्हापूर : अंबाबाई मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार असलेल्या महाद्वारातील अतिक्रमण बुधवारी महापालिकेने हटविल्याने या परिसराने मोकळा श्वास घेतला. मंदिराची पहिली ओळख असलेल्या या महाद्वाराला चिंचा आवळेवाले, चपलांचे स्टॅन्ड, दुकानदारांनी बाहेरपर्यंत मांडलेल्या वस्तूंनी वेढले होते. मंदिराचे प्रवेशद्वार कुठे आहे, हेच विचारण्याची वेळ भक्तांवर आली होती. देवस्थान समितीच्या कठोर भूमिकेनंतर अखेर येथे अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली.
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या वतीने गेल्या तीन दिवसांपासून मंदिरातील अंतर्गत व बाह्य परिसरातील अतिक्रमण हटाव मोहीम तीव्र केली आहे. याबाबत पुढील कार्यवाही करण्यासंदर्भात बुधवारी समितीच्या अंबाबाई मंदिर येथील कार्यालयात देवस्थान समिती, मनपा परिसरातील व्यावसायिक यांच्या बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी अध्यक्ष महेश जाधव, अतिरिक्तआयुक्तश्रीधर पाटणकर, उपायुक्त मंगेश शिंदे, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, पोलीस निरीक्षक प्रमोद जाधव, वाहतूक शाखेचे अनिल गुजर, आरोग्याधिकारी दिलीप पाटील, अतिक्रमण विभागाचे पंडित पोवार, देवस्थानच्या संगीता खाडे, शिवाजी जाधव, सचिव विजय पोवार, शिवाजी साळवी उपस्थित होते.
यावेळी केलेल्या पाहणीदरम्यान महाद्वारासमोरील सर्व अतिक्रमण महापालिकेने पोलीस प्रशासनाच्या सहकार्याने हटविले. कारवाईदरम्यान व्यावसायिक व मनपा कर्मचाऱ्यांमध्ये शाब्दिक चकमक उडाली; मात्र येथील व्यवसाय बेकायदेशीर असून, मंदिराच्या सुरक्षेला धोका निर्माण करणारा असल्याचे सांगत प्रशासनाने कारवाई केली.यावेळी महेश जाधव म्हणाले, अंबाबाई मंदिराला चारीही बाजूंनी अतिक्रमणाचा विळखा पडला आहे. पारंपरिक व्यावसायिकांबरोबरच बेकायदेशीरपणे व्यवसाय करणाºयांचे प्रमाण वाढल्याने भाविकांना त्रास होत आहे. मंदिराची सुरक्षा, भाविकांना सुविधा, स्वच्छता यासाठी अतिक्रमण, बेकायदेशीर व्यावसायिक मनपाने त्वरित हटविले पाहिजेत. मंदिराशी निगडित व्यावसायिकांचे योग्य प्रकारे पुनर्वसन करण्यासाठी मनपाशी चर्चा करण्याचे आश्वासन जाधव यांनी दिले.आठ दिवसांची मुदतघाटी दरवाजाच्या उजव्या बाजूच्या बेकायदेशीर व्यावसायिकांनाअतिक्रमण हटविण्यासाठी देवस्थान समितीने आठ दिवसांची मुदत दिली आहे. तसे न झाल्यास कारवाईचा इशाराही देण्यात आला. तर डाव्याबाजूच्या जुन्या दुकानदारांनाही अतिक्रमणाबाबतच्या सूचना करण्यात आल्या. बाहेर बसणाºया फेरीवाल्यांना हटविण्याबाबत तसेच सरलष्कर भवन व विद्यापीठ हायस्कूल पार्किंगजवळचे अतिक्रमण हटविण्याबाबतही चर्चा करण्यात आली.अंबाबाई मंदिराच्या महाद्वारामधील अतिक्रमण बुधवारी हटविण्यात आल्याने भाविकांना मोकळेपणाने परिसरात फिरता येत होते.