इंदुमती गणेश ।कोल्हापूर : अंबाबाई मंदिराच्या विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यात भाविकांच्या सोयीसुविधांना केंद्रस्थानी ठेवण्यात आले असले तरी जेथे खºया अर्थाने विकासाची गरज आहे तो मंदिराच्या भोवतालचा परिसरच यातून वगळला आहे. शाळांची गर्दी, रस्ते अडविलेले फेरीवाले, वाहनांची कोंडी, बेशिस्त पार्किंग अशा बजबजपुरीतच देवी अडकली आहे. एका तीर्थक्षेत्रासाठी आवश्यक असलेली शांतता, प्रसन्नता यायची असेल तर कपिलतीर्थ मार्केटच्या बहुमजली इमारतीच्या प्रस्तावात फेरीवाल्यांचे पुनर्वसन आणि बाह्य परिसरात येथील शाळांचे स्थलांतर करणे गरजेचे आहे. असे झाल्यास हा परिसर मोकळा श्वास घेऊन भाविकांना निवांतपणे फिरण्याचा आणि खरेदीचाही देईल.
अंबाबाई मंदिराला लागून विद्यापीठ हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज आहे. समोर इंदुमती गर्ल्स हायस्कूल आहे. या शाळांमधील मिळून जवळपास तीन हजार विद्यार्थ्यांची फार मोठी गर्दी होते. येथेच विद्यार्थ्यांच्या सायकलींसह दुचाकी, चारचाकी वाहने लावली जातात. मेन राजाराम हायस्कूलचेही विद्यार्थी येथे असतात. त्यामुळे या शाळांचे स्थलांतर करून त्या शाळांच्या इमारतींचा उपयोग दर्शनमंडप, यात्री निवास, अन्नछत्रसारख्या भाविकांना सोयीसुविधा देण्यासाठी करता येईल. शाळा गावाबाहेर नेल्या तर विद्यार्थ्यांची गैरसोय होणार आहे. त्यामुळे महापालिकेच्या बंद पडलेल्या शाळांची जागा त्यांना दिल्यास विद्यार्थ्यांचीही जवळच सोय होईल.
मंदिराच्या दक्षिण दरवाजाबाहेरील प्रांत कार्यालयाजवळ उभारण्यात आलेल्या स्वच्छतागृहात कमालीची अस्वच्छता असते. वाहत आलेले पाणी, दुर्गंधीचे ओंगळवाणे दर्शन घेत आणि नाकाला रुमाल लावत येथून भाविक मंदिरापर्यंत जातात. महाद्वाराच्या कमानीपर्यंत आवळे-चिंचावाल्यांनी मोठ्या बुट्ट्या मांडून मंदिरात जाण्या-येण्याचा रस्ताच अडवून ठेवला आहे. दुतर्फा असलेल्या दुकानदारांनी बाहेर तीन-चार फूट मांडव व पत्रे मारून अतिक्रमण केले आहे. त्यांतील अनेक दुकानदार समोरची जागा फेरीवाल्यांना देऊन दुहेरी उत्पन्न लाटत आहेत. गजरेवाले, बांगड्यावाले, पिनावाले स्टॅँड लावून बसलेले असतात. तेथेच चप्पल स्टॅँडही आहे. या गर्दीत मंदिरात जायला-यायला एका माणसापुरता रस्ता राहतो. गर्दीच्या वेळी श्वास गुदमरायला होते.
एवढी गर्दी पाहून एकही फेरीवाला थोडेसे बाजूला होऊन रस्ता देण्याचे सौजन्य दाखवित नाही. तेथून पुढे सरस्वती टॉकीजच्या चौकापर्यंत हीच अवस्था आहे. दुकानदार, फेरीवाले, फळ-भाजी विक्रेते, खाद्यपदार्थ विक्रेते, रिक्षावाले आणि भरीस भर म्हणजे दुचाकी व चारचाकी वाहने, अशा सगळ्या भाऊगर्दीतून वाट काढत चालणे म्हणजे जीव नकोसा होतो. इकडे जोतिबा रोडचीही स्थिती अशीच.
अंबाबाई मंदिराच्या पहिल्या टप्प्यातील विकास आराखड्यातच रस्ते आणि फेरीवाल्यांचा विचार होणे अपेक्षित होते; पण अभ्यासपूर्ण दृष्टिकोनाचा अभाव होताच; शिवाय नवा प्रस्ताव म्हटले की विरोध हा ठरलेलाच. शिवाय लगेच राजकीय दबाव टाकला जात असल्याने महापालिकेनेही त्यात स्वारस्य दाखविले नाही.भाजीवाले-फेरीवाल्यांचे पुनर्वसनदोन-तीन वर्षांपूर्वी महापालिकेने कपिलतीर्थ मार्केटच्या जागेवर बहुमजली पार्किंगचा प्रस्ताव केला होता. मात्र, भाजीवाल्यांनी त्याला विरोध केला. विकास आराखड्यानुसार आता सरस्वती टॉकीजच्या जागेत बहुमजली पार्किंग करण्यात येणार आहे. महाद्वार रोड, ताराबाई रोड आणि जोतिबा रोडवर मिळून साडेतीनशेच्यावर फेरीवाले आहेत. त्यामुळे कपिलतीर्थ मार्केटच्या तळमजल्यावर भाजी मंडई, वरच्या मजल्यावर शॉपिंग कॉम्प्लेक्स उभारून तेथेच फेरीवाल्यांचे पुनर्वसन करता येईल. अंबाबाई भक्तांसाठी चालविल्या जाणाºया महालक्ष्मी अन्नछत्रासाठीही मोठी जागा मिळेल. सरस्वती टॉकीज येथे उभारण्यात येणाºया बहुमजली पार्किंगच्या प्रस्तावातही हे करता येईल. त्यासाठी भाजी विक्रेते व फेरीवाल्या संघटनांनी सहकार्य करणे अपेक्षित आहे.
महापालिकेने फेरीवाल्यांना सोयीसुविधा देऊन योग्य ठिकाणी पुनर्वसन करावे. त्या बदल्यात काही रक्कम आकारावी. असे केल्याने महापालिकेचेही उत्पन्न वाढेल. फेरीवाल्यांनाही व्यवसाय करण्यास अडचणी येणार नाहीत.- महेश उरसाल (उपाध्यक्ष, महाद्वार रहिवासी व्यापारी संघ)अंबाबाई मंदिराचा पूर्ण परिसर फेरीवाल्यांनी वेढला आहे. फेरीवाल्यांनी रस्त्यांवर व्यवसाय करू नये आणि भाविकांना मोकळेपणाने फिरता यावे यासाठी महापालिकेने फेरीवाल्यांचे पुनर्वसन करावे. त्यासाठी कपिलतीर्थ मार्केट किंवा सरस्वती टॉकीज येथील बहुमजली इमारतींचा विचार व्हावा.- महेश जाधव, अध्यक्ष, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती