वसंत भोसले-कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराविषयी वारंवार अनेक वाद निर्माण होत आहेत. त्यातील अनेक वाद अकारण निर्माण केले जात आहेत. या सर्व मंदिरांविषयी दीर्घकालीन परिणाम करणारे ठाम निर्णय घेण्यात कोणी पुढाकार घेत नाही, त्याचा परिणाम या वादाचे पडसाद उमटत राहतात. गेल्यावर्षी अंबाबाईला घागरा-चोळी नेसविण्यात आली. तेव्हा पुजारी हटवायची मोहीम सुरू झाली. ती इतकी तीव्र झाली की, पुजारी हटविण्याचा निर्णय राज्य शासनास घ्यावा लागला. मात्र, तो निर्णय अद्याप अमलात आलेला नाही. त्यावरून पुन्हा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
अशा वातावरणात पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने अंबाबाईच्या दर्शनासाठी येताना ठरावीक पद्धतीचा पोशाख परिधान करावा, असा निर्णय घेतला. त्याला ड्रेसकोड म्हटले जाऊ लागले आहे. वास्तविक, तो ड्रेसकोड वगैरे नाही. ड्रेसकोड म्हणजे ठरावीक पद्धतीचा पोशाख परिधान करण्याचे बंधन येत असते. तसा काही निर्णय देवस्थान समितीने घेतलेला नाही.
कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात दर्शनासाठी दरवर्षी जवळपास पाऊण कोटी लोक येतात. कोल्हापूर शहराच्या लोकसंख्येच्या तिप्पट ही संख्या आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात येणारे भाविक हे पर्यटक म्हणूनही वावरत असतात. कोल्हापूर शहराची अनेक वैशिष्ट्ये आहेत. त्यात पौराणिक परंपरा आहे, ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे आणि सामाजिक, आर्थिक परिस्थितीचीसुद्धा भूमी म्हणून कोल्हापूरकडे पाहिले जाते. या सर्वाच्या पार्श्वभूमीने कोल्हापूरची भूमी विकसित झाली आहे. तिला निसर्गाचे वरदान मिळाले आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या कार्यकर्तृत्वाचे लाभदायी वरदानही मिळाले आहे. त्यामुळे ती कलानगरी आहे. क्रीडानगरी आहे, कुस्तीपंढरी आहे, चित्रनगरीसुद्धा ती आहे. त्यामुळे कोल्हापुरात येणारा भाविक किंवा पर्यटक हा या सर्व पार्श्वभूमीच्या आकर्षणाने येतो आहे. तो केवळ भाविक नाही, तो पर्यटक आहे. तो हौशी आहे. शिवाय कोल्हापूरच्या भौगोलिक स्थानाला देखील खूप महत्त्व आहे. दक्षिण काशी म्हटले जाते. ती दक्षिण महाराष्टची राजधानीही आहे. पाच नद्यांच्या काठावर वसलेले संपन्न शहर आहे. गोवा, कोकण आणि कर्नाटकाच्या वेशीवरील महाराष्टÑाचे अखेरचे शहर आहे. येथून पुढे कोकणात जाता येते, गोव्यात पर्यटनाला जाता येते. कर्नाटकातही अनेक स्थळांकडे जाता येते. यात मोठ्या संख्येने पर्यटकांची संख्या आहे. केवळ कोल्हापूरच्या अंबाबाईच्या दर्शनासाठी आलेत आणि परत निघालेत असे होत नाही. महाराष्टÑातील बहुतेक सर्वच मराठी माणसाला कोल्हापूरविषयी प्रचंड आकर्षण आहे. खाद्यसंस्कृतीही महत्त्वाची ठरते. त्यामुळे कोल्हापूरला भेट देणारा हा भाविक कमी आणि पर्यटक अधिक असतो.
गोवा, कर्नाटक आणि कोकणात जाऊन येताना किंवा जाताना कोल्हापूरला हा पर्यटक भेट देत असतो. कोल्हापूरचा अधिक विस्तार करायला हवा आहे. हैदराबादजवळचे रामोजीराव फिल्मसिटीसारखी कोल्हापूरला चित्रनगरी उभी करता येऊ शकते. राजर्षी शाहू महाराज यांच्या स्मारकाच्या रूपाने कोल्हापूरचा इतिहास सांगणारे उत्तम जागतिक दर्जाचे म्युझियम उभे करता येऊ शकते. पारंपरिक कुस्त्यांच्या तालमींचे रूपांतर आधुनिक क्रीडानगरीत करता येऊ शकते. जेणेकरून कोल्हापूरला येणारा पर्यटक किमान तीन- चार दिवस राहिला पाहिजे आहे. आज तसे होताना दिसत नाही. अंबाबाईचे दर्शन झाले की, रंकाळा किंवा राजर्षी शाहू म्युझियम पाहून तातडीने कोकण किंवा गोव्याकडे पर्यटक निघून जातो आहे. अशा पर्यटकांवर पोशाखाचे (ड्रेसकोड) बंधन करावे, हा प्रश्न उपस्थित होतो.
तिरूपतीला जाणारा माणूस हा केवळ भाविक असतो. तो पर्यटक कमी असतो. त्यामुळे कोल्हापूरला येणाऱ्या पर्यटकांकडे तुलनेने पाहायला हवे. तो केवळ भाविक नाही. अंबाबाईचे दर्शन हा सर्वांत महत्त्वाचा भाग त्याच्या कोल्हापूर भेटीचा आहे. याविषयी वाद नाही. त्यामुळे त्याच्याकडे केवळ भाविक म्हणून पाहता येणार नाही. आणखीन एक महत्त्वाचा बदल अलीकडच्या काळात नव्यापिढीबरोबर झाला आहे. तो म्हणजे खाद्यसंस्कृती बदलली, दळणवळणाची साधने बदलली तशी लोकांच्या पोशाखाची रीतही बदलली आहे. अनेकजण बर्मुडा घालून प्रवासाची सुरुवात करतात. पूर्वीच्या काळी आपल्याकडे बहुतांश माणसे अर्धग्नच असायची. आजही सह्याद्री पर्वतरांगांमध्ये राहणारा पुरुष वर्ग अति पावसामुळे अर्धी चड्डी घालूनच वावरतो. त्याचा तो सोईचा पोशाख आहे. पर्यावरण, हवामान आणि सोय पाहून माणसं पोशाखाची निवड करतात. त्यात सोयही आता महत्त्वाची ठरत आहे. आता असंख्य महिला नोकरी- व्यवसायाच्या निमित्ताने दररोज घराच्या बाहेर वावरत असतात. त्यांना पारंपरिक साडी- ब्लाऊज हा पोशाख अडचणीचा वाटतो. याचा अर्थ त्यांनी परंपरा सोडली, संस्कृती मोडीत काढली असा होत नाही. तो सोयीचा असतो.
मध्यमवयीन महिलांही जीन्स पँट घालून कार्यालयात वावरत असतात किंवा किमान चुडीदारच पेहरावा वापरणे पसंत करतात. साडी ब्लाऊज हा परंपरागत पोशाख सांभाळणे शक्य होत नाही. अनेक महिला आता सण-समारंभ किंवा कार्यक्रमातच हा पोशाख ‘खास’ म्हणून उपयोगात आणतात.
अशा सर्व पार्श्वभूमीवर देवस्थान समितीने कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात प्रवेश करताना ठरावीक किंवा पूर्ण पोशाख घालूनच प्रवेश करावा, हा दंडक योग्य आहे का? म्हटले तर तो आताच्या बदलत्या परिस्थितीत असे निर्बंध घालणे योग्य वाटत नाही. कारण अंबाबाई मंदिरात येणारा पर्यटक हा संमिश्र भावनेने प्रवासाला निघालेला असतो. मात्र, सार्वजनिक ठिकाणी वावरताना काही संकेत पाळायला हवेत. ही जाणीव करून देणे योग्य आहे. यात महिला किंवा पुरुष असाही भेदभाव करू नये. श्रद्धेने येणाºया भाविकांनी योग्य पोशाख घालून मंदिरात भक्तिभावाने जाण्यास कोणतीही अडचण नाही. त्यांनी नवे कपडे घातले पाहिजेत, त्यांनी धोतरच नेसायला हवे किंवा सोहळेच नेसले पाहिजे. असाही दंडक पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने घातलेला नाही. परिपूर्ण पोशाख असावा, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. तो पूर्ण चुकीचा आहे असे वाटत नाही. पर्यटनस्थळ किंवा मंदिराचे स्थळ यात फरक निश्चितच करायला हवा. जरी आपण पर्यटनाच्या मूडमध्ये असलो तरी कोठे जातो आपल्या आजूबाजूला कोण आहे याचे सामाजिक भान सर्वांना असायला हवे.