कोल्हापूर : शारदीय नवरात्रोत्सवाच्या दुसऱ्या माळेला सोमवारी करवीर निवासिनी श्री अंबाबाईची महागौरी रूपात सालंकृत पूजा बांधण्यात आली. दुर्गेच्या नऊ रूपातील हे आठवे रूप आहे.महागौरी ही गौरवर्णाची आहे. अष्टवर्षा भवेद गौरी म्हणजे ती आठ वर्षाची आहे. वस्त्रालंकार श्वेत वर्णाचे आहे. ही देवी चतुर्भुज असून, तिचे वाहन वृषभ आहे. तिच्या वरच्या उजव्या हातात अभय मुद्रा, खालच्या हातात त्रिशूळ, वरच्या डाव्या हातात डमरू खालच्या हातात वरमुद्रा आहे. तिची भावमुद्रा प्रसन्न व शांत आहे. पार्वतीच्या रूपात तिने भगवान शिवाला पती म्हणून मिळविण्यासाठी कठोर तपश्चर्या केली होती. तिने प्रतिज्ञा केली होती की मी वरदान देणाऱ्या शिवाशीच विवाह करेन. कठोर तपश्चर्येमुळे तिचे शरीर काळे पडले, तिच्या तपश्चर्येने प्रसन्न होऊन शिवाने तिला गंगेचे पवित्र स्नान घडवले त्यामुळे तिचे शरीर गौरवर्णाचे झाले. चिती शक्ती अमोघ व फलदायी आहे. तिच्या उपासनेने भक्तांच्या पापाचे क्षालन होते. भविष्यातील दु:ख दैन्य येत नाहीत. श्री महागौरीचे ध्यानस्मरण, आराधना, उपासना भक्तांसाठी कल्याणकारी आहे. तिच्या कृपेने अलौकिक सिद्धई मिळते. अशक्य कार्य सिद्धीला जातात पुराणामध्ये तिचा महिमा खूप वर्णन केला आहे. अशा या महागौरी रूपात अंबाबाईची सालंकृत पूजा झाली.
ही पूजा आनंद मुनीश्वर, किरण मुनिश्वर, चैतन्य मुनिश्वर, मयूर मुनिश्वर, श्रीनिवास जोशी, सचिन गोटखिंडीकर यांनी बांधली.