लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : देवी अंबाबाई, भवानी मंडप आणि किल्ले पन्हाळ्याबद्दल जिल्हा प्रशासनाच्या वेबसाईटवर असलेली चुकीची माहिती हटवली जाणार आहे. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी ही माहिती दिली. अशा पध्दतीची चुकीची माहिती असल्याचे ‘लोकमत’ने उघडकीस आणल्यानंतर तत्काळ देसाई यांनी हा निर्णय घेतला. खासदार संभाजीराजे यांनीही या वृत्ताची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहिले.
जिल्हा प्रशासनाच्या Kolhapur.gov.in या वेबसाईटवर कोल्हापूर जिल्ह्याच्या पर्यटन स्थळांबाबत जी माहिती दिली आहे. त्यामध्ये अंबाबाई देवी, भवानी मंडप आणि पन्हाळ्याबद्दल अतिशय चुकीचे संदर्भ दिले आहेत. अंबाबाईच्या मूर्तीमध्ये विशिष्ट धातू असल्यामुळे प्राचीन काळापासून मूर्तीवर प्रकाश फेकला जातो. देवीच्या हातामध्ये तलवार आहे. भवानी मंडपातील तुळजाभवानी मंदिरामध्ये थडगे आहे, असे हे उल्लेख आहेत. तसेच ही माहिती देणारी भाषाही चुकीची असून शुध्दलेखनाच्या असंख्य चुका आहेत. हे वाचूनच आलेल्या मुंबईच्या पर्यटक महिलेने तुळजाभवानी मंदिरात थडगे कुठे आहे, अशी विचारणा केली होती.
याबाबतची माहिती मिळताच ‘लोकमत’ने रविवार दि. २१ मार्चच्या अंकामध्ये याबाबत सविस्तर वृत्त प्रसिध्द केले. या वृत्ताची खासदार संभाजीराजे यांनी दिल्लीत असतानाही दखल घेतली आणि तातडीने याबाबत सविस्तर पत्र तयार करून ते जिल्हाधिकाऱ्यांना पाठवले. या वृत्ताची दखल घेत जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनीही ही माहिती हटवण्याचा निर्णय घेतला आहे.
सर्वांनीच दक्षता घेण्याची गरज
स्थानिक स्वराज्य संस्थांसह विविध सहकारी, स्वयंसेवी संस्था आपापल्या वेबसाईट तयार करत असतात. अशा वेळी त्या त्या गावचे, शहराचे महात्म्य सांगण्यात येते. परंतु त्या त्या क्षेत्रातील अभ्यासकांनी लिहिलेल्या लिखाणाचा संदर्भ घेण्याची गरज आहे. अन्यथा चुकीची माहिती सातत्याने प्रसारित होण्याचा धोका असतो.
खासदार संभाजीराजे यांचा फोटो वापरावा
हे तर छत्रपती घराण्याचे देवघर
‘लोकमत’मधील वृत्ताची तातडीने दखल घेत खासदार संभाजीराजे यांनी सविस्तर पत्रच जिल्हाधिकाऱ्यांना लिहिले आहे. यामध्ये ते म्हणतात, जुन्या राजवाड्यामध्ये तुळजाभवानीचे मंदिर नसून वस्तुत : ते छत्रपती घराण्याचे देवघर आहे. त्यास ‘श्री अंबा देवघर’ म्हटले जाते. संपूर्ण करवीर राज्याचा राज्यकारभार जिथून चालला, १८५७ च्या क्रांतिकारक उठावाची सूत्रे चिमासाहेब महाराजांनी जिथून सांभाळली, राजर्षि छत्रपती शाहू महाराजांचा राज्याभिषेक ज्या ठिकाणी झाला, अशा अनेक ऐतिहासिक प्रसंगांचा साक्षीदार असलेला ‘जुना राजवाडा’ या वास्तूचा इतिहास शासकीय संकेतस्थळावर चुकीच्या पध्दतीने मांडला जाणे क्लेशदायक आहे.
शासनाची यंत्रणा काय करते?
अनेकांचे आराध्य दैवत असणाऱ्या अंबाबाईबद्दल आणि भवानी मंडप आणि तुळजाभवानी मंदिराबाबत अतिशय आक्षेपार्ह अशी माहिती देण्यात आली आहे. ही माहिती लिहिली गेल्यानंतर वेबसाईटवर टाकताना शासनाची यंत्रणा काय करत होती? असा सवाल इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांनी उपस्थित केला आहे. कोट्यवधी लोक वेबसाईट बघत असतात. त्यांच्यापर्यंत ही अतिशय आक्षेपार्ह अशी माहिती गेली आहे. ती तातडीने बदलावी असे ते म्हणाले.
कोट
जिल्हा प्रशासनाच्या वेबसाईटवरून अंबाबाई आणि भवानी मंडपाची माहिती चुकीच्या पध्दतीने दिली असल्याचे ‘लोकमत’मधून वाचले. वास्तविक पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीची अधिकृत वेबसाईट आहे. त्यावरून माहिती घेऊन किंवा आमच्याशी संपर्क साधून ही अधिकृत माहिती घेतली असती तर ते योग्य ठरले असते. ही माहिती ताबडतोब हटवावी, असे पत्र देवस्थान समितीकडून आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना देणार आहोत.
महेश जाधव, अध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती, कोल्हापूर
कोट
वेबसाईटवरील चुकीची आणि आक्षेपार्ह माहिती हटवली जाणार आहे. नवी माहिती देताना ती इतिहास अभ्यासक आणि संशोधक यांच्याकडून खात्री करून घेतली जाईल.
दौलत देसाई, जिल्हाधिकारी, कोल्हापूर