कोल्हापूर : ललिता पंचमीनिमित्त उद्या गुरुवारी मानकऱ्यांच्या उपस्थितीत टेंबलाई टेकडीवर कोहळा फोडण्याचा पारंपरिक विधी होणार आहे. करवीरनिवासिनी श्री अंबाबाई, तुळजाभवानी आणि गुरूमहाराज वाड्यातील पालख्या सजवलेल्या वाहनांतून टेंबलाई टेकडीकडे जातात. या सोहळ्याच्या निमित्ताने त्र्यंबोली यात्रा भरते. महानगरपालिकेने या यात्रेच्या मार्गावरील स्वच्छता मंगळवारी केली.ललिता पंचमी म्हणजे कोहळा पंचमी टेंबलाई टेकडीवरील मंदिरात साजरी होते. ललिता पंचमीच्याच दिवशी श्री अंबाबाईने कोल्हासुराचा वध केला. त्यामुळे त्र्यंबोली देवीच्या प्रतीकरूप कुमारीच्या पूजनानंतर तिच्या साक्षीने कोहळा फोडला (कुष्मांड बळी) जातो. परंपरेनुसार कुमारीपूजनाचा मान गुरव घराण्याकडे आहे. श्रीमंत छत्रपतींच्या हस्ते कुमारीपूजन झाल्यानंतर कुमारिकेच्या हस्ते त्रिशूलाने कुष्मांड बळीचा पारंपरिक सोहळा होतो.गुरुवारी सकाळी दहाच्या सुमारास तोफेची सलामी दिल्यानंतर करवीरनिवासिनी श्री अंबाबाईची पालखी पूर्व दरवाजातून भवानी मंडपात येईल. तेथून फुलांनी सजवलेल्या वाहनातून पालखी टेंबलाई टेकडीकडे रवाना होईल. त्या पाठोपाठ तुळजाभवानी आणि गुरू महाराज वाड्यातील पालख्या बाहेर पडतील.शिवाजी चौक, बिंदू चौक, कॉमर्स कॉलेज, बागल चौक, कमला कॉलेज मार्गे टेंबलाई टेकडी असा पारंपरिक मार्ग आहे. पालखी शाहू मिल, टाकाळा येथे काही काळ थांबते. टेंबलाई मंदिर कमानीजवळ सजवलेल्या वाहनांतून पालख्या आल्यानंतर तेथून मंदिरात चालत पालख्या नेल्या जातील आणि त्यानंतर कोहळा फोडण्याचा विधी होणार आहे.
Kolhapur: अंबाबाई उद्या त्र्यंबोली देवीच्या भेटीला जाणार, कोहळा फोडण्याचा पारंपरिक विधी होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2023 1:41 PM