कोल्हापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करवीरनिवासिनी श्री अंबाबाईचा रथोत्सव सोहळा मंगळवारी प्रतीकात्मक आणि साध्या पद्धतीने पार पडला. मंदिर परिसरात प्रदक्षिणा घालून पालखी सोहळा पूर्ण करण्यात आला.दरवर्षी जोतिबाच्या चैत्र यात्रेनंतर दुसऱ्या दिवशी श्री अंबाबाईचा रथोत्सव होतो. कोरोनामुळे या वर्षी मंगळवारी मंदिराच्या आवारात प्रतीकात्मकरीत्या रथोत्सव साजरा करण्यात आला. रंगीबेरंगी फुलांनी सजविलेल्या, आकर्षक विद्युत रोषणाई केलेल्या चांदीच्या रथामध्ये श्री अंबाबाईची उत्सवमूर्ती विराजमान झाली.
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे सचिव विजय पवार, व्यवस्थापक धनाजी जाधव, पोलीस निरीक्षक प्रमोद जाधव यांच्या हस्ते रथपूजन झाले. रात्री साडेनऊच्या सुमारास तोफेची सलामी झाल्यानंतर पारंपरिक वाद्यांचा गजर, ह्यअंबा माता की जयह्णचा जयघोष आणि मोजक्या लोकांच्या उपस्थितीत काही पावले रथ चालवत नेण्यात आला. कदम कुटुंबीयांनी पूजा केल्यानंतर उत्सवमूर्ती पालखीत ठेवून मंदिर परिसरात प्रदक्षिणा घालून सोहळा पूर्ण झाला. त्यानंतर आरती झाली.
पालखीसमोर प्रमोद धर्माधिकारी, पूजा शेटे, कुणाल माने, रोहित आवळे यांनी भजन, भक्तिगीतांचे गायन केले. यावेळी केदार मुनीश्वर, महादेव मुनीश्वर, राजू मेवेकरी, मंदार मुनीश्वर, बंटी सावंत, सुयश पाटील, धैर्यशील तिवले, आदींसह श्रीपूजक, देवस्थान समितीचे कर्मचारी उपस्थित होते. दरम्यान, आज, बुधवारी शिवछत्रपती आणि महाराणी ताराराणी यांचा रथोत्सव साध्या पद्धतीने होणार आहे.सोहळ्याचे थेट प्रक्षेपणया रथोत्सव आणि पालखी सोहळ्याचे देवस्थान समितीच्या वतीने सोशल मीडियावरून थेट प्रक्षेपण करण्यात आले. मंदिराच्या प्रवेशद्वारातून काही भाविकांनी दर्शन घेतले. रथोत्सवाच्या मार्गावर काही भाविकांनी रांगोळ्या काढल्या होत्या.