कोल्हापूर : करवीरनिवासिनी कोल्हापूरच्या श्री अंबाबाई मंदिराच्या गाभाऱ्याचे आता ३६० अंश कोनातून दर्शन होणार आहे. याबाबतची प्राथमिक चाचपणी, मंदिराचे चित्रीकरण, छायाचित्रण काल्पनिक संकल्पचित्र या संस्थेकडून करण्यात आले आहे. संस्थेचे ‘व्ही. आर. डिव्होटी’ हे अॅप्लिकेशन आवडल्यास पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या वतीने त्याला परवानगी दिली जाईल.सध्या अंबाबाई देवीच्या मूर्तीचे आॅनलाईन दर्शन सुरू असते. याद्वारे भाविक केवळ अंबाबाईची मूर्ती पाहू शकतात. मात्र ‘व्ही. आर. डीव्होटी’ हे असे अॅप आहे, ज्याद्वारे तुम्ही पूर्ण मंदिर मोबाईलवर पाहू शकता. सुरू असलेल्या स्क्रीनवर बोट फिरविले की, पूर्ण मंदिराचा व्ह्यू आपल्याला दिसेल. हे अॅप सध्या पंढरपुरातील विठ्ठल मंदिरात कार्यान्वित करण्यात आले आहे. याशिवाय भारतातील काही मंदिरांमध्येही ते सुरू आहे.
देशातील ५१ शक्तिपीठांमध्ये समावेश असलेल्या करवीरनिवासिनी श्री अंबाबाई मंदिरातही हे अॅप बसविण्याचा प्रस्ताव ‘काल्पनिक इमॅजिन बिर्इंग देअर’ या संस्थेने पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीसमोर ठेवला. प्राथमिक सुरुवात म्हणून समितीने सदर संस्थेला अॅपची पूर्वतयारी म्हणून गाभाऱ्याचे चित्रीकरण व छायाचित्रणासाठी परवानगी दिली. त्यानुसार गेले दोन दिवस मंदिरात हे काम सुरू होते.
या चित्रीकरण व छायाचित्रणाच्या आधारे संबंधित कंपनी अॅप तयार करून देवस्थान समितीला दाखविणार आहे. समितीला हे अॅप पसंत पडल्यास अंबाबाई मंदिरातदेखील पुढील दोन महिन्यांत हे अॅप कार्यान्वित केले जाईल, अशी माहिती समितीचे सचिव विजय पोवार यांनी दिली.