लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : शारदीय नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर करवीरनिवासिनी अंबाबाईच्या चांदीच्या पालखीची स्वच्छता रविवारी गरुड मंडप येथे करण्यात आली. त्याचबरोबरच मंदिरातील स्वच्छतेच्या कामाला वेग आला असून, आवारातील शनि मंदिर परिसरात दिवसभर स्वच्छतेचे काम युद्धपातळीवर सुरू होते.अवघ्या चार दिवसांवर आलेल्या शारदीय नवरात्रौत्सवानिमित्त करवीरनिवासिनी अंबाबाई मंदिरामध्ये जोरदार तयारी सुरू आहे. रविवारी मंदिर व्यवस्थापनाने देवीच्या नित्यपूजेतील चांदीच्या भांड्यासह चांदीच्या पालखीची स्वच्छता केली. भांड्यामध्ये एकारती, पंचारती, धुपारती यांच्यासह पालखी संलग्न अन्य वस्तूंची स्वच्छता करण्यात आली. मंदिर आवारातील अन्य वास्तूंची व फरशांची स्वच्छताही करण्यात आली. दरम्यान, सोमवारी देवीचे पारंपरिक सोन्याचे दागिने व अन्य मौल्यवान वस्तूंची स्वच्छता करण्यात येणार आहे. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्यावतीने मंदिराशी संलग्न विविध घटकांच्या बैठका घेऊन नवरात्रौत्सवाच्या तयारीबाबत चर्चा केली जाणार आहे. विशेषत: दर्शनरांगेतून भाविकांना सुलभ दर्शनासह अन्य सुविधाही मिळाव्यात यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.
अंबाबाईच्या चांदीच्या पालखीची स्वच्छता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2017 1:01 AM