कोल्हापूर : कोरोनामुळे करवीरनिवासिनी श्री अंबाबाईचे मंदिर भाविकांसाठी बंद असले तरी देवीलाच घराघरांतील मोबाईलपर्यंत पोहोचविण्यासाठी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने मंदिरच डिजिटल विश्वावर आणले आहे. नवरात्रौत्सवाचे मुहूर्त साधून शनिवारी ऑनलाईन लाईव्ह दर्शन, फेसबुक पेज, यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवरील पेजचे उद्घाटन अध्यक्ष महेश जाधव व खजिनदार वैशाली क्षीरसागर यांच्या हस्ते झाले.अंबाबाई मंदिरातील गरुड मंडपात हा कार्यक्रम झाला. यावेळी समितीचे सदस्य राजू जाधव, शिवाजीराव जाधव, सचिव विजय पोवार, मनोरमा सोल्युशन्सच्या अश्विनी दानीगोंड, मंदिराचे व्यवस्थापक धनाजी जाधव उपस्थित होते.यावेळी महेश जाधव म्हणाले, दरवर्षी नवरात्रौत्सवात लाखोंच्या संख्येने भाविक अंबाबाई मंदिरात येतात. यंदा कोरोनामुळे डिजिटल माध्यमाद्वारे देवीलाच भक्तांपर्यंत पोहोचविण्याचा देवस्थानचा प्रयत्न आहे. पहाटेच्या काकडआरतीपासून रोजची सालंकृत पूजा, पालखी हा सगळा सोहळा भाविकांना ऑनलाईन पाहता येणार आहे. यावेळी अश्विनी दानीगोंड यांनी डिजिटायझेशनचे महत्त्व विशद करून देवस्थान समितीने अंबाबाईची सेवा करण्याची संधी दिली याबद्दल आभार मानले.या पेजवर अंबाबाईचे दर्शन घेऊ शकता.
https://play.google.com/store/apps/detailsid=com.smac.ambabailive
https://www.mahalaxmikolhapur.com/gallery/shri-mahalaxmi-live-darshan.htmlमाहिती प्रादेशिक भाषांमध्येहीडिजिटल माध्यमावर अंबाबाईची माहिती भारतातील विविध ५० ते ६० भाषांमध्ये उपलब्ध आहे. त्यामुळे भाविक कोणत्याही प्रांतातील असो अथवा जगाच्या पाठीवर कुठेही असो; त्यांना एका क्लिकवर थेट अंबाबाईचे दर्शन व माहिती मिळणार आहे. याशिवाय कोल्हापुरातील स्थानिक बी चॅनेल व एसपीएन चॅनलवरही लाईव्ह दर्शनाची सोय आहे.