कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या रंकाळा तलावालगतच्या अंबाई जलतरण तलावाची पाणी शुद्धिकरण यंत्रणा पुन्हा एकदा बंद पडली आहे. खिशाला परवडणाऱ्या तिकिटामध्ये पोहण्याचा सराव करण्यासाठी या तलावाचा सर्वसामान्य जलतरणपटूंना एकमेव आधार आहे. वारंवार बंद पडणाऱ्या शुद्धिकरण यंत्रणेमुळे जलतरणपटूंसह पालकांमध्ये तीव्र नाराजीचा सूर उमटत आहे.शहरातील सर्वांत कमी दर असणारा आणि सर्वसामान्य जलतरणपटूंचा एकमेव आधार असणारा हा तलाव आहे. उन्हाळी व दिवाळी सुट्ट्यांमध्ये या तलावावर भरगच्च गर्दी असते. तासाला २० रुपये असा या जलतरण तलावाचा दर आहे; त्यामुळे तो वर्षातील सर्व महिने गर्दीचा असतो.
सध्या त्याची शुद्धिकरण यंत्रणा (फिल्टरेशन प्लँट) कुचकामी आहे. दिवसातील १० तासांपेक्षा अधिक काळ शुद्धिकरणाची मोटर सुरू ठेवावी लागते. तरीही हा तलाव पूर्णत: शुद्ध होत नाही. पोहणाऱ्यांची संख्या आणि ४० वर्षांपूर्वीची तलावाची शुद्धिकरण यंत्रणा यांचा ताळमेळ बसत नसल्याने यंत्रणेत वारंवार बिघाड ठरलेलाच असतो.
२० ते ३० जूनदरम्यान पाणी प्रदूषित झाले म्हणून तलाव बंद करण्यात आला होता. त्यानंतर पुन्हा त्यातील पाणी दुर्गंधीयुक्त व हिरवेगार दिसू लागले आहे; त्यामुळे तलाव १७ जुलैपासून पुन्हा सुरू झाला. त्यानंतर आता २३ आॅगस्टपासून हा शुद्धिकरण यंत्रणेतील ‘बॅकवॉश पंप’ नादुरुस्त झाल्याने तलाव गेल्या १० दिवसांपासून बंद ठेवण्यात आला आहे.
सद्य:स्थितीत पाणीपुरवठा विभागाच्या कर्मचाऱ्यांनी हा पंप दुरुस्त करून बसविला आहे; मात्र तलावातील पूर्ण पाणी शुद्धिकरण होण्यासाठी अजूनही चार दिवसांचा कालावधी लागणार असल्याने बुधवारी (दि. ४ सप्टेंबर) पासून तो पूर्ववत होण्याची शक्यता आहे.ही यंत्रणा बदलामहापालिकेचा वर्षातील सहा महिने गर्दीचा एकमेव तलाव असून त्याकडे पोहणाऱ्या अबालवृद्धांचा ओढा अधिक आहे. त्यात ४० वर्षांपूर्वीची शुद्धिकरण यंत्रणा तिच्या कालमर्यादेनुसारवारंवार बिघडते. तरीही येथील कर्मचारी ती रात्रीचा दिवस करून पुन्हा पूर्ववत करतात. प्रशासनाने तलावातील शुद्धिकरण यंत्रणाच नवीन बसवून हा तलाव कायमस्वरूपी पोहण्यासाठी खुला करावा व स्पर्धेची तयारी करणाºया जलतरणपटूंची गैरसोय टाळावी, अशी मागणी पालकांकडून होत आहे.