कोल्हापूर : करवीरनिवासिनी अंबाबाई देवीच्या किरणोत्सवास उद्या, शुक्रवारपासून सुरुवात होत आहे. आज, गुरुवारी सायंकाळी पाच ते सहा वाजण्याच्या दरम्यान आकाश निरीक्षणासाठी वापरल्या जाणाऱ्यां मोठ्या दुर्बिणीद्वारे किरण मार्गातील अडथळ्यांची तपासणी केली जाणार आहे.वर्षातून दोन वेळा होणाºया अंबाबाई देवीच्या किरणोत्सव मार्गात मानवनिर्मित अडथळे मोठ्या प्रमाणात आहेत; त्यामुळे ते दूर करण्यासाठी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती सातत्याने प्रयत्नशील आहे, तर अभ्यासक प्रा. मिलिंद कारंजकर हेही आपल्या अभ्यासक विद्यार्थ्यांसह देवीच्या मूर्तीपर्यंत तीव्र क्षमतेची किरणे विनाअडथळा कशी पोहोचतील यांचा अभ्यास व अडथळे दूर करण्यासाठी उपाययोजना सुचवीत आहेत.
त्यानुसार बुधवारी सायंकाळी प्रा. कारंजकर यांच्या अभ्यासपथकाने सायंकाळी पाच वाजल्यापासून किरणांचा अभ्यास केला. प्रथम ५.३० वाजण्याच्या सुमारास ढगाळ वातावरण होते. त्यानंतर पाच वाजून ३७ मिनिटांनी वातावरणात बदल होत गेला. त्यानंतर किरणे पितळी उंबरठ्यापर्यंत पोहोचली.
या ठिकाणी नियमित वातावरणात किरणे १५० लक्स इतक्या तीव्र क्षमतेची लागतात; मात्र बुधवारी सायंकाळी ढगाळ वातावरणानंतर ९९ लक्स इतकी किरणांची तीव्रता मिळाली; त्यामुळे आज, गुरुवारी सायंकाळी किरणांची तीव्रता वाढेल, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला, तर सायंकाळी पाचनंतर किरणोत्सव मार्गात अडथळा कोणत्या ठिकाणाहून होतो, याबाबत आकाश निरीक्षणासाठी वापरल्या जाणाऱ्या मोठ्या दुर्बिणीचा वापर केला जाणार आहे.
अडथळे दूर करण्यासाठी देवस्थानकडून दक्षता घेण्यात आली आहे. भाविकांना किरणोत्सवाचा सोहळा विनाअडथळा पाहण्यास मिळावा; याकरिता मंदिर परिसरात मोठ्या स्क्रीनची व्यवस्था केली जाणार आहे.- विजय पोवार,सचिव, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती