कोल्हापूर : ‘सकाळचे प्रसन्न वातावरण..मंत्रोच्चार..अंबा माता की जय’चा गजर आणि मंदिराच्या पवित्र सानिध्यात रविवारी श्री महालक्ष्मी अन्नछत्र सेवा ट्रस्ट आयोजित कुंकूमार्चन सोहळा पार पडला. या सोहळ्यात चार हजारांहून अधिक महिलांनी सहभाग घेतला.संस्थेतर्फे गेल्या पाच वर्षांपासून भव्य प्रमाणात हा कुंकूमार्चन सोहळा आयोजित केला जातो. सर्वसामान्य महिलांना शास्त्रशुद्ध पद्धतीने व विधीवतरीत्या देवीच्या उपासनेचे समाधान मिळावे, हा यामागचा उद्देश आहे.
या सोहळ्यासाठी भवानी मंडपात भव्य मांडव व व्यासपीठ उभारण्यात आले होते. मध्यभागी श्री अंबाबाईच्या प्रतिकृतीची सालंकृत पूजा बांधण्यात आली होती. भोवतीने फुलापानांची सुंदर आरास होती. भक्तीने भारलेल्या या वातावरणात सकाळी ७.३0 वाजता वेदमूर्ती सुहास जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली या कुंकूमार्चन विधीला सुरुवात झाली. कोल्हापूर ब्राह्मण पुरोहीत संघाने मंत्रोच्चार केले.या सोहळ्यात महिला गुलाबी रंगाची साडी, केसात गजरा यांसह पारंपरिक मराठमोळ्या वेशभूषेत सहभागी झाल्या होत्या. भवानी मंडपासह अंबाबाई मंदिराचा पूर्व दरवाजा परिसर महिलांच्या गर्दीने भरून गेला होता. यावेळी २१ सुवासिनींना ‘लकी ड्रॉ’च्या माध्यमातून पैठणी बक्षीस म्हणून देण्यात आली.
कोल्हापूरसह पुणे, मुंबई, बेळगाव व सीमाभागातील महिलाही यावेळी उपस्थित होत्या. या सोहळ्यासाठी संस्थेचे अध्यक्ष राजू मेवेकरी, संजय जोशी, राजेश सुगंधी, तन्मय मेवेकरी, मयुर तांबे, अंकित भोसले, अजित जाधव, विराज कुलकर्णी यांच्यासह कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.