कोल्हापूर : अंबाबाई मंदिर परिसरात सुरक्षा व वाहतुकीची कोंडी फोडण्याच्या दृष्टीने मंदिर परिसरातील १०० मीटरचा परिसर ‘नो व्हेईकल झोन’ करण्याच्या प्रस्तावाबाबत शुक्रवारी महापालिकेत पोलीस व प्रादेशिक परिवहन कार्यालतील अधिकाऱ्यांच्या समन्वय बैठकीत चर्चा झाली. शहरातील पार्किंग समस्या सोडविण्यासाठी लवकरच एकत्रित सर्वेक्षण करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.महापालिका, पोलीस प्रशासन व प्रादेशिक परिवहन कार्यालय यांची संयुक्त आढावा बैठक आयुक्त पी. शिवशंकर यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेच्या मुख्य कार्यालयात झाली. बैठकीसाठी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र वर्मा, शहर वाहतूक शाखेचे निरीक्षक आर. आर. पाटील, अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत आदी उपस्थित होते.अंबाबाई मंदिर परिसरात पार्किंगमुळे वाहतुकीची मोठी कोंडी होते. त्यावर तोडगा काढण्यासाठी गांधी मैदानाचा काही भाग, शाहू व शिवाजी स्टेडियमच्या बाहेरील परिसर येथे वाहने पार्किंग करण्यासाठी जागा उपलब्ध करावी, अशी मागणी आर. आर. पाटील यांनी केली. त्यानंतर संयुक्त पाहणी करून याबाबत तोडगा काढण्याचे ठरले. भवानी मंडप येथील मेन राजाराम हायस्कूलमध्ये उन्हाळी सुटीमध्ये पार्किंगसाठी जागा उपलब्ध करून द्यावी यासाठी जिल्हा परिषदेकडे मागणी करण्याची सूचना आयुक्तांनी केली.भाऊसिंगजी रोड, स्टेशन रोड, शिवाजी पुतळा परिसर, पार्वती टॉकीज परिसर, बागल चौक ते उमा टॉकीज चौकापर्यंतच्या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात रस्त्यावर थांबणाऱ्या वाहनांना पार्किंग व्यवस्था उपलब्ध करण्यासाठी रस्ता सोडून राहिलेली शिल्लक जागा काँक्रिट टाकून समतल करण्याचे ठरले. (प्रतिनिधी)
अंबाबाई परिसर ‘नो व्हेईकल झोन’?
By admin | Published: May 15, 2015 11:27 PM