कोल्हापूर : ‘गोकुळ’चे संचालक अंबरिश घाटगे हे सत्तारूढ आघाडीतूनच निवडणूक लढविणार असल्याचे सोमवारी स्पष्ट झाले. माजी आमदार संजय घाटगे यांनी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांना, अन्य निवडणुकीत मी तुमच्यासोबत राहीन, परंतु ‘गोकुळ’मध्ये आमदार पी. एन. पाटील यांच्यासोबत राहायचे ठरविले असल्याचे स्पष्ट केले असल्याचे सांगण्यात आले.
मंत्री मुश्रीफ यांचा अंबरिश यांना विरोधी आघाडीत घेण्याचा प्रयत्न होता. गेल्या निवडणुकीत जोरदार विरोध करून मुश्रीफ यांनीच अंबरिश यांना सत्तारुढ आघाडीत घेण्यास विरोध दर्शवला. शेवटी कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर त्यांनी अर्ज भरला व विरोधी आघाडीतून निवडणूक लढवली. त्यांना पालकमंत्री सतेज पाटील यांची मोठी मदत झाली. त्यामुळे ते विजयी झाले. परंतु निवडणुकीनंतर संचालक मंडळाच्या पहिल्याच बैठकीत ते सत्तारुढ आघाडीत मिसळून गेलेच, शिवाय विधानपरिषदेच्या निवडणुकीतही ते माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्यासोबत राहिले. यामुळे पालकमंत्री सतेज पाटील यांचाही त्यांना आघाडीत घेण्यास विरोध आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी स्वत:च आपण आमदार पाटील यांच्यासोबत सत्तारूढ आघाडीसोबतच राहायचे निश्चित केले आहे.