गैबी चौकाला चौतीस वर्षांचा सहवास
लोकमत न्यूज नेटवर्क
कागल : येथील ऐतिहासिक गैबी चौकात ३४ वर्षांपूर्वी उभारण्यात आलेला डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अर्धपुतळा निपाणी वेशीजवळील शाहू उद्यानात बुधवारी विराजमान झाला. १९८७ साली ज्येष्ठ नेते स्व. विक्रमसिंह घाटगे यांनी पुढाकार घेऊन गैबी चौकात हा पुतळा उभारला होता. आता ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या पुढाकाराने या चौकात डाॅ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचे पूर्णाकृती पुतळे उभारले जात आहेत. त्यामुळे हा पुतळा शाहू उद्यानात हलविण्यात आला आहे.
बुद्ध जयंतीचे औचित्य साधून शाहू उद्यानातील या पुतळयाचे उद्घाटन नगराध्यक्ष माणिक माळी, ‘गोकुळ’चे संचालक नवीद मुश्रीफ, जिल्हा बॅंकेचे संचालक भय्या माने, श्रीनाथ समूहाचे अध्यक्ष चंद्रकात गवळी, प्रकाश गाडेकर, आदींच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी मान्यवर उपस्थित होते. शाहू उद्यानात राजर्षी शाहू महाराजांचाही अर्धपुतळा असून, तो कोल्हापूरच्या छत्रपतीनीं दिला आहे.
चौकट...
● गैबी चौकातच पुतळा हवा...
सुमारे ३५ वर्षांपूर्वी जेव्हा कागल शहरात डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारण्याचा विषय समोर आला, तेव्हा अनेकांनी विविध जागा सुचवल्या. गैबी चौक सभा, समारंभाचे ठिकाण असल्याने येथे पुतळा नसावा, अशी भूमिका मांडली गेली. पण राजर्षी शाहूंचे विचार खऱ्या अर्थाने जोपासणाऱ्या विक्रमसिंह घाटगे यांनी एका वाक्यात बजावले. आंबेडकरांचा पुतळा गैबी चौकातच असेल. हा पुतळा छत्रपती शाहू साखर कारखान्याच्यावतीने सिद्धार्थ तरूण मंडळाला प्रदान केला होता.
● असाही योगायोग... ३४ वर्षांपूर्वी विलासराव देशमुख यांच्या हस्ते पुतळ्याचे उद्घाटन झाले होते. तेव्हा दिनकरराव ढवण हे नगराध्यक्ष तर रमेश माळी उपनगराध्यक्ष होते. आता रमेश माळी यांच्या पत्नी माणिक माळी या लोकनियुक्त नगराध्यक्ष आहेत. मंत्री हसन मुश्रीफ यांनी तीन पुर्णाकृती पुतळे उभारण्यासाठी भरीव निधी पालिकेला दिला आहे. तसेच पुतळ्याचे स्थलांतर करताना तेव्हा जशी उद्घाटनाच्या मजकुराची पाटी होती, ती आहे तशीच ठेवली आहे.
फोटो कॅप्शन
कागल येथील शाहू उद्यानात डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे उद्घाटन नुकतेच करण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष माणिक माळी, भय्या माने, नवीद मुश्रीफ, रमेश माळी, आदी उपस्थित होते.