कोल्हापूर : येथील महापालिकेच्या सावित्रीबाई फुले रुग्णालयात कोविड लसीकरणावेळी उपायुक्तांशी हुज्जत घालून रुग्णवाहिकेवरील चालकास धक्काबुक्की करून शिवीगाळ करण्याचा प्रकार गुरुवारी सकाळी घडला. या प्रकरणी सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याबद्दल प्रवीण प्रकाश मस्कर (वय ३५, रा. रविवार पेठ, कोल्हापूर) याला जुना राजवाडा पोलिसांनी अटक केली.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सावित्रीबाई फुले रुग्णालय येथे शासनाकडून कोविड-१९ ची लस उपलब्ध होईल त्याप्रमाणे नागरिकांना देण्याचे काम सुरू आहे. गुरुवारी सकाळी महापालिकेच्या उपायुक्त शिल्पा दरेकर ह्या भेट देण्यासाठी सावित्रीबाई रुग्णालय येथे आल्या. त्यावेळी कोविड लस उपलब्ध नसल्याच्या कारणावरून संशयित आरोपी प्रवीण मस्कर याने त्यांच्याशी मोठमोठ्याने बोलून, वाद घालून सरकारी कामात अडथळा निर्माण केला. हा वाद वाढल्याने रुग्णालयातील रुग्णवाहिकेचा चालक केतन धोंडीराम खोंदल (वय २४, रा. खेडकर गल्ली, लक्षतीर्थ वसाहत) याने संशयित मस्कर याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी संशयिताने खोंदल याचा शर्ट पकडून त्यास धक्काबुक्की करून शिवीगाळ केली. तसेच बघून घेतो अशी धमकी दिली. गोंधळ वाढल्याने तेथील अतुल पवार, साहिल तमाईचे यांनी संशयितास रुग्णालयाच्या बाहेर घालविले. त्याचवेळी संशयित मस्कर याने रुग्णालयाच्या दारात पडलेला दगड उचलून जमावाच्या दिशेने फेकून मारला.
या घटनेमुळे परिसरात गोंधळ माजला. रुग्णवाहिका चालक केतन खोंदल याने जुना राजवाडा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार संशयित आरोपी प्रवीण मस्कर याच्यावर सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याबद्दल गुन्हा नोंद झाला. पोलिसांनी त्याल दुपारी अटक केली.
फोटो नं. ०१०७२०२१-कोल-प्रवीण मस्कर (आरोपी)
010721\01kol_8_01072021_5.jpg
फोटो नं. ०१०७२०२१-कोल-प्रविण मस्कर (आरोपी)