कोल्हापूर : यावर्षी विचित्र हवामान परिस्थितीमुळे शेती आतबट्ट्यात असतानाच आता अमेरिकन लष्करी अळीने धुमाकूळ घालण्यास सुरुवात केल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. मका, ज्वारी, ऊस या पिकांचा ही अळी फडशा पाडत आहे. पूर्णपणे पाने खात असल्याने पिकांच्या नुकसानीचे प्रमाण ७० टक्क्यांच्याही वर आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १६८ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे या अळीने नुकसान केले आहे.कोल्हापूर जिल्ह्यात या वर्षी अतिपावसामुळे पिकांवरील कीड रोगांचे प्रमाण गतवर्षीच्या तुलनेत जास्त आहे. जास्त पाऊस आणि कमी सूर्यप्रकाशामुळे या अळ्यांचे प्रमाण वाढले. यात हुमणी, लोकरी मावा, तुडतुडे, गोगलगाय, सुरवंटासह पावसाळ्यातील किड्यांनी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले. यात पाने खाणाऱ्या लष्करी अळीचाही समावेश होता. या वर्षी तर सलग पावसामुळे या अळीकडून होणाऱ्या नुकसानीच्या प्रमाणात वाढच झाली.
जिल्ह्यातील बाधित क्षेत्र (हेक्टरमध्ये)करवीर (५५), कागल (५४), पन्हाळा (४०), गडहिंग्लज( १०), आजरा (०५), चंदगड (०४).
असे करा नियंत्रणकृषी सहायकांच्या मदतीने तातडीने यावर उपाययोजना सुचविल्या जात आहेत. कामगंध सापळ्याबरोबरच एकात्मिक किडी व्यवस्थापनसह क्लोरोअॅट्रानिलीप्रोल १८.५ एस.सी. अथवा नोमुरिया रिलेयी ४ ग्रॅम प्रतिलिटर पाण्यातून मिसळून फवारणी केल्यास या किडीचा प्रादुर्भाव रोखता येऊ शकतो. तसेच या अळीचा प्रसार रोखण्यासाठी म्हणून या अळीचे नर पतंग पकडणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी फेरोमोन सापळे शेतात लावण्याविषयी कृषी विभागाकडून प्रात्यक्षिके दाखविली जात आहेत.
या अळीच्या डोक्यावर उलटा ‘वाय’ आकाराचे चिन्ह दिसते आणि तिच्या शेवटच्या भागावर काळ्या रंगाचे चार ठिपके असतात. या वैशिष्ट्यावरून ही अळी ओळखता येते. या अळीची वाढ पूर्ण होण्यासाठी १५ ते १६ दिवस लागतात. पूर्ण वाढलेली अळी जमिनीत कोषावस्थेत जाते आणि सात ते आठ दिवसांतून त्यातून पतंग बाहेर पडतो. या किडीचा जीवनक्रम २५ ते ३० दिवसांत पूर्ण होतो. या पतंग आणि मादीच्या मिलनातून पुन्हा अंडीपुंज तयार होऊन एका पुंजातून सात ते आठ अळ्या तयार होतात. अशा प्रकारे या अळ्यांचा प्रसार वाढत जातो. त्यामुळे या धोकादायक अळीचा प्रसार रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना करणे महत्त्वाचे आहे.पांडुरंग मोहिते, कीटकशास्त्रज्ञ, कृषी महाविद्यालय, कोल्हापूर