कोल्हापूर : येथील जिल्हाधिकारी कार्यालयानजीकच्या ‘अमेरिकन मिशन बंगला’ म्हणून नोंद असलेल्या ५७ एकर १७ गुंठे जमिनीच्या मिळकत पत्रिकेवर ‘सक्षम प्राधिकरणाच्या पूर्व परवानगीशिवाय हस्तांतरणास बंदी’ असा शेरा नमूद करून दुरुस्त केलेल्या मिळकत पत्रिका सादर कराव्यात, असे आदेश अप्पर जिल्हाधिकारी किशोर पवार यांनी सोमवारी काढला. सह जिल्हा निबंधक, नगर भूमापन अधिकाऱ्यांना हा आदेश पुढील कार्यवाहीसाठी देण्यात आला.
शहरातील ई वार्डातील सि.स.नं २५९ अ मधील मिळकतीवरील ब सत्ता प्रकार कमी करून क करण्याचा आदेश तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी ८ एप्रिल, २०१० दिला होता. या आदेशावर आक्षेप घेत, सामाजिक कार्यकर्ते दिलीप देसाई यांनी तक्रार केली. त्यानंतर, विभागीय आयुक्तांनी सत्ता प्रकार बदलाच्या आदेशाचे पुनर्विलोकन करण्याचे आदेश दिले. यानुसार, महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६चे कलम २५८(१) प्रमाणे सुनावणी सुरू आहे.
तरीही सि.स.नं. २५९ अ मिळकतीमधील हस्तांतरण व इतर प्रकारच्या व्यवहारांच्या नोंदी होत असल्याचे निदर्शनास आले आहे. म्हणून या मिळकतीसंबंधी सुनावणी प्रक्रिया पूर्ण होऊन याचा अंतिम निर्णय होईपर्यंत कोणत्याही प्रकारच्या दस्तांची नोंदणी करण्यात येऊ नये. अगर कोणत्याही प्रकारच्या नोंदी मिळकत पत्रिकेवर ‘सक्षम प्राधिकाऱ्यांच्या पूर्व परवानगीशिवाय हस्तांतरणास बंदी’ असा शेरा नमूद करण्याचे आदेशात म्हटले आहे. दरम्यान, या आदेशामुळे यापुढील काळात अमेरिकन मिशन जमिनीच्या खरेदी-विक्रीला ब्रेक लागला आहे.
पुरावे द्यावेत
अप्पर जिल्हाधिकारी पवार यांनी काढलेल्या दुसऱ्या आदेशातून प्रतिवादी असलेल्या १२ जणांना २० मे, २०२२ रोजी सकाळी साडेदहा वाजता जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात या जमिनीसंबंधी दस्तऐवज, पुरावे सादर करावेत, अशी नोटीस देण्यात आली आहे, याशिवाय या जमिनीसंबंधी आणखी कोणी संबंधित असेल, तर त्यांनीही पुरावे द्यावेत, असेही आवाहन करण्यात आले आहे.
गाव चावडीवरील फलकावर नोटीस प्रसिद्ध करा
बारा प्रतिवाद्यांना आणि जमिनीसंबंधीच्या इतर हिसंबंधितांना पुरावा देण्यासंबंधीची नोटीस करवीर तहसीलदारांनी गाव चावडीच्या फलकावर प्रसिद्ध करावी. याची एक प्रत अमेरिकन मिशनच्या जमिनीच्या ठिकाणी ठळकपणे प्रसिद्ध करावी. याचा पंचनामा करून अहवाल द्यावा, शिवाय जिल्हा माहिती अधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील तीन दैनिकांत ही नोटीस प्रसिद्ध करावी, असाही आदेश अप्पर जिल्हाधिकारी पवार यांनी दिला आहे.