कोल्हापूर : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी दुपारी करवीरनिवासिनी अंबाबाई देवीचे दर्शन घेत तिला शालू अर्पण केला.भाजप उमेदवारांच्या प्रचारसभेसाठी आलेले केंद्रीय मंत्री शहा यांनी तपोवन येथील सभा आटोपून दुपारी पावणेदोन वाजता करवीरनिवासिनी अंबाबाई देवीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासोबत पालकमंत्री चंद्रकांत पाटील, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, सदस्य शिवाजीराव जाधव, राजेंद्र जाधव, सचिव विजय पोवार उपस्थित होते.देवस्थान समितीतर्फे त्यांना देवीची चांदीची प्रतिमा, तर हक्कदार श्रीपूजकांतर्फे नगरसेवक अजित ठाणेकर, केदार मुनीश्वर यांनी प्रतिमा भेट दिली. शहा यांनी देवीस शालू अर्पण केला. नियोजित दौऱ्यानुसार गृहमंत्री शहा देवीच्या दर्शनासाठी सकाळी ११ वाजता येणार होते. मात्र, दिल्लीहून त्यांचे विमान दोन तास उशिराने आले. त्यामुळे सकाळपासून मंदिराच्या परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
परिणामी मंदिराच्या परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप आले होते. दर्शनासाठी आलेल्या हजारो भाविकांना महाद्वार व घाटी दरवाजा येथून प्रवेश दिला जात होता; तर विद्यापीठ हायस्कूलकडील दरवाजा खास शहा यांच्यासाठी राखीव ठेवण्यात आल्याने बंद करण्यात आला होता. त्यात अश्विन पौर्णिमेनिमित्त देवीचा प्रसाद असल्याने दर्शन व महाप्रसादासाठी मोठी गर्दी होती. दुपारी एक वाजून ५४ मिनिटांनी मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आलेला हा बंदोबस्त शिथिल करण्यात आला.अवघ्या नऊ मिनिटांत दर्शन