कोल्हापूर : गुंतवणुकीवर दरमहा १३ टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालणारा ठकसेन अमोल नंदकुमार परांजपे (रा. उमरावकर गल्ली, उत्तरेश्वर पेठ, कोल्हापूर) याला लक्ष्मीपुरी पोलिसांनी सोमवारी (दि. २५) अटक केले. त्याने पत्नी नीलम परांजपे (रा. उत्तरेश्वर पेठ) हिच्यासोबत २०१९ पासून सप्टेंबर २०२३ पर्यंत गुंतवणूकदारांची सुमारे दोन कोटी २८ लाख ६३ हजार ४०० रुपयांची फसवणूक केली आहे. ‘लोकमत’ने ही फसवणूक उघडकीस आणली होती.याबाबत अधिक माहिती अशी की, संशयित परांजपे याने कोविड काळात उत्तरेश्वर पेठेतील नागरिकांना मोबाइलच्या रिचार्जवर सवलत देऊन विश्वास संपादन केला. त्यानंतर ट्रेडिंगसाठी गुंतवणूक घेणे सुरू केले. दरमहा १३ टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवून सुरुवातीला परतावे दिले. मे २०२३ पासून परतावे मिळणे बंद झाल्याने गुंतवणूकदारांनी मुद्दल परत मागण्यास सुरुवात केली.तगादा वाढल्यानंतर त्याने शहरातून पळ काढला. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच गुंतवणूकदारांनी लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांकडून संशयित परांजपे याचा शोध सुरू होता. अखेर सोमवारी त्याला अटक करण्यात पोलिसांना यश आले. याबाबत अभिषेक आनंदराव पाटील (वय २०, रा. टाकाळा, कोल्हापूर) याने फिर्याद दिली असून, सहायक पोलिस निरीक्षक रुपाली पाटील अधिक तपास करीत आहेत.गुंतवणूकदारांची गर्दीठकसेन परांजपे याला अटक केल्याची माहिती मिळताच उत्तरेश्वर पेठ येथील गुंतवणूकदारांनी लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात गर्दी केली. काही गुंतवणूकदार तर त्याला मारण्याची भाषा करीत होते. त्यामुळे पोलिसांनी समजूत घालून गुंतवणूकदारांना परत पाठवले.
सांगली, पुण्यात लपला
गुंतवणूकदारांकडून पैसे परत मागणीचा तगादा सुरू होताच संशयित परांजपे पळून गेला होता. गेले तीन महिने सांगली आणि पुणे येथे लपल्याची माहिती त्याने पोलिसांना दिली. गुंतवणूकदारांकडून घेतलेल्या तीन कोटी रुपयांतील बहुतांश पैसे त्यांना परत केल्याचा दावा त्याने केला आहे.
पैसे गुंतवलेच नाहीतपरांजपे याने गुंतवणूकदारांकडून घेतलेले पैसे पुढे शेअर बाजारात गुंतवलेच नाहीत. नवीन गुंतवणूकदारांकडून घेतलेले पैसे परताव्याच्या रुपाने जुन्या गुंतवणूकदारांना दिले, अशी माहिती तपासात समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले.
‘लोकमत’चा पाठपुरावासंशयित अमोल परांजपे याने गुंतवणूकदारांना गंडा घातल्याची बातमी सर्वप्रथम लोकमतने १२ सप्टेंबर २०२३ मध्ये प्रसिद्ध केली. याची दखल घेऊन पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी तातडीने तपास करण्याच्या सूचना लक्ष्मीपुरी पोलिसांना दिल्या होत्या.