कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक अमोल जगन्नाथ येडगे यांची कोल्हापूरचे नवे जिल्हाधिकारी म्हणून बुधवारी बदली झाली. आज, गुरुवारी ते पदभार स्वीकारतील. त्यांच्या जागेवर जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांची नियुक्ती झाली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील १७ अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या.अमोल येडगे हे मूळचे कराड येथील असून, त्यांनी कोल्हापुरातील प्री आयएएस ट्रेनिंग सेंटरमध्ये प्रशिक्षण पूर्ण केले आहे. ते २०१४ च्या आयएएस बॅचचे अधिकारी आहेत. त्यांनी जळगावमध्ये प्रशिक्षण कालावधी पूर्ण केला. त्यानंतर कळमनुरी (जि. हिंगोली) येथे सहायक जिल्हाधिकारी म्हणून काम केले. पुढे त्यांची बदली नाशिक येथे सहायक जिल्हाधिकारी म्हणून झाली.आयटीडीपीचे प्रकल्प संचालक म्हणूनही काम केले. अमरावती, बीड येथे त्यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून चांगले काम केले. यवतमाळचे जिल्हाधिकारी म्हणूनही त्यांनी कोविड काळात उठावदार काम केले.
कोल्हापुरात प्री आयएएस ट्रेनिंग सेंटरमध्ये शिक्षण घेतले आहे. त्यामुळे या भूमीशी माझे जुने ऋणानुबंध आहेत. कोल्हापूरला लाभलेल्या कला, क्रीडा, पर्यटन आणि संस्कृतीच्या वारशाला चालना देण्यासाठी काम करेन. औद्योगिक विकासाला गती देण्याचा प्रयत्न राहील. गतिमान आणि लोकाभिमुख प्रशासन करीत नागरिकांना, तरुण पिढीला व सहकाऱ्यांना सोबत घेऊन कोल्हापूरचे नाव अजून उज्ज्वल होईल असे काम करू. - अमोल येडगे, नूतन जिल्हाधिकारी, कोल्हापूर.