लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कोल्हापूर विभागात बनावट बिले तयार करून साडेसात लाखांचा अपहार केल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी तत्कालीन लेखापाल संतोष अण्णा कांबळे (मूळ रा. भादवण, ता. आजरा, सध्या रा. शासकीय निवासस्थान, विचारेमाळ, कोल्हापूर) याच्यावर लक्ष्मीपुरी पोलिसांत शुक्रवारी गुन्हा दाखल झाला. सध्या कांबळे हा पुणे राज्य उत्पादन शुल्क विभागात कार्यरत आहे. कोल्हापूर विभागातील भोंगळ कारभार उजेडात आल्याने प्रशासकीय विभागात खळबळ उडाली आहे.
अधिक माहिती अशी, संतोष कांबळे हा राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कोल्हापूर कार्यालयात लेखापाल पदावर कार्यरत होता. त्याने सन २०११ ते २०१४ या काळात कर्मचाºयांची बोगस बिले तयार करून साडे सात लाखांचा घोटाळा केल्याचे लेखापरीक्षणात उघडकीस आले आहे. कर्मचाºयांची मागणी नसतानाही प्रवासभत्ते, वैद्यकीय बिले, वेतन भत्ते मंजूर करून घेतले आहेत. याशिवाय काही कर्मचाºयांनी दाखल केलेल्या बिलांची रक्कमही परस्पर हडप केली आहे. चार वर्षांच्या काळात ५८३ बिलांचे ७ लाख ४५ हजार ४७२ रुपये हडप केले आहेत. लेखाधिकारी एस. आर. पाटील व साहाय्यक लेखाधिकारी आर. ए. पाटील यांनी नोव्हेंबर २०१४ मध्ये केलेल्या लेखापरीक्षणात हा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे.
दरम्यान, जुलै २०१४ मध्ये कांबळे याची पुणे येथे बदली झाली. कोल्हापुरातील कार्यालयीन प्रमुखांनी याबाबत कांबळेला ‘कारणे दाखवा नोटीस’ पाठविली. समक्ष कार्यालयात हजर राहून खुलासा करण्याचेही कळविले. मात्र, अद्याप कांबळे कार्यालयीन चौकशीसाठी हजर राहिलेला नाही. कांबळे याने घोटाळ्यातील ६ लाख १२ हजार ८३९ रुपये कोषागार कार्यालयात भरले आहेत. उर्वरित १ लाख ३२ हजार ६३३ रुपयांची रक्कम अद्याप भरलेली नाही. पदाचा गैरवापर करून आर्थिक अपहार केल्याप्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे उपअधीक्षक संजय पाटील यांनी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार संतोष कांबळे याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.