मुंबई/कोल्हापूर : कॉ. गोविंदराव पानसरे हत्याकांडाच्या तपासात महत्त्वाची भूमिका बजावणारे कोल्हापुरातील राजारामपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक अमृत देशमुख यांची नागपूर येथे झालेली बदली अखेर रद्द केली आहे.विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील आणि कॉ. गोविंदराव पानसरे यांच्या कन्या कॉ. स्मिता पानसरे व भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या शिष्टमंडळाने मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. पानसरे हत्येचा तपास सुरू असताना प्रथम तत्कालीन पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांची वर्धा येथे बदली झाली. दरम्यानच्या कालावधीत कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक रितेशकुमार यांचीही बदली झाली. त्यानंतर तत्कालीन जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांची बदली झाली. त्याचबरोबर सुरुवातीपासून या हत्येच्या प्रकरणातील सर्व पुरावे गोळा करणारे तपास अधिकारी राजारामपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक अमृत देशमुख यांची बदली झाली, तर त्यांचा तपासावर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता आहे, असे या शिष्टमंडळाने सांगितले. त्यानुसार ही बदली तत्काळ रद्द करण्याचे मुख्यमंत्र्यांनी मान्य करत तसे आदेश जारी केले. खासदार राजू शेट्टी यांनीही काल, मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन अशीच मागणी केली होती. मुख्यमंत्र्यांना मंगळवारी भेटलेल्या या शिष्टमंडळात भाकपचे राज्य सचिव कॉ. प्रकाश रेड्डी, मुंबई कार्यकारिणी सदस्य कॉ. प्रकाश नार्वेकर, कॉ. राजन बावडेकर, कॉ. अशोक सूर्यवंशी, अॅड. कॉ. बन्सी सातपुते, कॉ. हेमंत बुट्टे आदींचा समावेश होता. तपासासाठी स्वतंत्र अधिकारी नेमणारपानसरे हत्याप्रकरणी सरकारने नेमलेल्या एसआयटीवर पूर्णवेळ व स्वतंत्र आयपीएस अधिकारी प्रमुख म्हणून नियुक्त करावा आणि त्यांच्या हाताखाली सक्षम पोलीस अधिकाऱ्यांचे पथक निर्माण करावे. त्याप्रमाणे या प्रकरणाचा तपास पूर्ण होईपर्यंत या पथकातील अधिकाऱ्यांची बदली करु नये, असेही शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांना सांगितले आहे. या मागणीलाही मुख्यमंत्र्यांनी सहमती दर्शवली.
अमृत देशमुख यांची बदली अखेर रद्द !
By admin | Published: June 01, 2016 1:26 AM