कोल्हापूर : कोल्हापूर शहरात ओपन बार, मटका-जुगार यासह अवैध धंदे अक्षरश: फोफावले असून त्यांच्या मुसक्या आवळा, अशी मागणी कोल्हापूर शहर सर्वपक्षीय नागरी कृती समितीने नूतन पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांच्याकडे शुक्रवारी केली. सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी मोहिते यांच्या समोर पोलिस अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांच्या कार्यकर्तृत्वाचा पाढाच वाचला. कृती समितीचे निमंत्रक आर. के. पोवार यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने पोलिस अधीक्षक मोहिते यांची भेट घेऊन शहरातील विविध प्रश्न मांडले. रहदारीच्यावेळी अवजड वाहने शहरात घुसतात, फुटपाथवरील अतिक्रमणांमुळे पादचाऱ्यांची गोची होत असून शहरात राजरोसपणे मटका, जुगार सुरू असताना पोलिस यंत्रणा काहीच करत नसल्याचे किशोर घाटगे यांनी सांगितले. खेळाची मैदाने रात्रीच्या वेळी ओपन बार झाली असून त्याचा नाहक त्रास खेळाडूंना होत असल्याचे सुहास साळोखे यांनी निदर्शनास आणून दिले. फुलेवाडी रिंगरोड परिसरात दारूभट्टी राजरोस सुरू असून येथील अलीकडील घटना पाहता येथे पोलिस चौकी सुरू करावी, अशी मागणी अमोल माने यांनी केली. अंबाबाई दर्शनासाठी येणारे भाविक, पुरेशी पार्किंग व्यवस्था नसल्याने कोंडी निर्माण होते. पार्किंगचा विषय ‘स्थायी’मध्ये अडकला असेल तर तिथे मार्गी लावू, अशी ग्वाही देत राजेश लाटकर म्हणाले, डिजीटल फलकांमुळे शहराचे विद्रूपीकरण झाले असून संबंधितांवर गुन्हे दाखल करा. एकाच दिवसात सगळ्या समस्या मार्गी लागणार नाहीत, पण त्यादृष्टीने आपले प्रयत्न राहणार आहेत. येथे येण्यापूर्वी तत्कालीन पोलिस अधीक्षक आर. के. पद्मनाभन, जोशी आदींच्याबरोबर चर्चा केली आहे. कोल्हापुरात काही तरी करून दाखवायचे आहे, पण आपणा सर्वांचे सहकार्य असावे, आवाहन पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांनी केले. सुरेश जरग, पंडितराव सडोलीकर, सतीशचंद्र कांबळे, संभाजी जगदाळे, नामदेव गावडे, विक्रम जरग आदी उपस्थित होते. चौकट- पोलिसांतील राजकारण आवरा! गेली दहा वर्षे एकाच पोलिस ठाण्यात मोक्याच्या ठिकाणी तळ ठोकून काहीजण बसले आहेत. त्यामुळे गुंडगिरी वाढली असून आजरा येथे नेमणूक आणि काम कोल्हापुरात सुरू आहे. हे पोलिस खात्यातील राजकारण तेवढे आवरा, अशी विनंती किसन कल्याणकर यांनी केली. टोल आंदोलनातील गुन्हे तेवढे काढा टोल आंदोलनात शेकडो कार्यकर्त्यांवर दाखल असलेले गुन्हे काढून टाकण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले होते; पण अद्याप काहीच झालेले नाही. पोलिस यंत्रणा कार्यकर्त्यांना त्रास देत असून हे गुन्हे काढून टाका, अशी मागणी बाबा पार्टे यांनी केली. पानसरे प्रकरणात लक्ष घातले गोविंद पानसरे खुनाचा उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ‘एसआयटी’तपास करत आहे. तपास अधिकारी सुहेल शर्मा यांच्याकडून माहिती घेतली असून संजयकुमार शर्मा यांच्याबरोबरही चर्चा झाली आहे. आतापर्यंतचा इतिहास पाहिला तर अशा केसेसमध्ये आपणाला लवकर यश मिळाल्याचेही मोहिते यांनी सांगितले. ‘जया-किसन’चा महापालिकेवर निशाणा शिष्टमंडळ भेटून गेले तरी जयकुमार शिंदे व किसन कल्याणकर यांनी मोहिते यांची पाठ सोडली नाही. महापालिकेनेच बेसमेंटमधील पार्किंग इतरांना दिल्याने पार्किंगचा बट्ट्याबोळ झाला आहे, तुमच्याकडून काहीच होणार नाही, असे सांगताच मोहिते अचंबित झाले.
ओपन बारसह अवैध धंदेवाल्यांच्या मुसक्या आवळा
By admin | Published: May 05, 2017 10:54 PM