कोल्हापूर : एकट्याच राहात असलेल्या वृध्देचा विश्वास संपादन करून त्यांच्या नावावरील बॅंकेतील सुमारे ८६ लाख ७७ हजार ९३२ रुपये परस्पर आपल्या नावे करून फसवणूक केल्याप्रकरणी एका एजंटावर करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. विष्णू लक्ष्मण पवार (रा. जगतापनगर, पाचगाव रोड, कोल्हापूर) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयिताचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, डॉ. सुमन वासुदेव वाेळींजकर (वय ८१, मूळ रा. पुणे) यांच्या नावे कळंबा रोडवरील अयोध्या कॉलनीत गुरुकृपा बंगला आहे. या बंगल्यात त्या एकट्याच राहतात. तो बंगला त्यांनी विक्रीसाठी काढला. त्याचा गैरफायदा घेऊन प्लॉट खरेदी-विक्री करणारा एजंट विष्णू पवार याने बंगला विक्रीसाठी त्यांच्या घरी वारंवार गिऱ्हाईक पाठवून वोळींजकर यांची ओळख वाढवली. त्यांचा विश्वास संपादन केला.
त्या बंगल्यात एकट्याच राहात असल्याचा गैरफायदा घेऊन विष्णू पवार याने त्यांच्या आर्थिक व्यवहाराची माहिती घेतली. तसेच त्यांचे एटीएम कार्ड, चेकवर सह्या घेऊन त्यांच्या परस्पर शाहूपुरी शाखेतील एस.बी.आय. बॅंक, पी.एन.बी. बॅंक, बॅंक ऑफ बडोदा या बॅंकांतून पैसे घेऊन स्वत:च्या नावे मुदतबंद ठेव ठेवली. अशा पध्दतीने विष्णू पवार याने सुमारे ८६ लाख ७७ हजार ९३२ रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार करवीर पोलीस ठाण्यात डॉ. वोळींजकर यांनी दिली. त्यानुसार एजंट विष्णू पवार याच्यावर गुन्हा नोंद झाला आहे.