कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या खजिन्यात १ कोटी ५८ लाख ९२ हजार ७०१ इतक्या घसघशीत देणगीची भर पडली आहे. मंदिर आवारातील देणगी पेट्यांमधील रकमेची चार दिवसांपासून सुरू असलेली मोजणी शुक्रवारी संपली. दुसरीकडे देवीच्या दागिन्यांच्या मूल्यांकनाचे काम मात्र संबंधित संस्थेने मध्येच थांबवले आहे.श्री अंबाबाई मंदिराच्या आवारात पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या १२ देणगी पेट्या असून सोमवारपासून त्यातील रकमेची मोजदाद सुरू होती. शुक्रवारी सायंकाळी ही मोजदाद पूर्ण झाली. मंदिरातील पहिल्या व दुसऱ्या पेटीत सर्वाधिक प्रत्येकी ४५ व ४६ लाखांची रक्कम जमा झाली आहे. यासह ७ क्रमांक व ११ क्रमांकाच्या पेटीत प्रत्येकी २५ व १९ लाखांवर रक्कम जमा झाली. सर्व देणगी पेट्यांतील रक्कम मिळून १ कोटी ५८ लाख ९२ हजार ७०१ रुपये एवढी रक्कम देवीच्या खजिन्यात जमा झाली आहे.दुसरीकडे देवीच्या गेल्या चार वर्षांतील दागिन्यांच्या मूल्यांकनाचे काम मध्येच थांबविण्यात आले आहे. नाशिकच्या नितीन वडनेरे यांच्या संस्थेकडून २०१९ सालापासूनच्या दागिन्यांच्या मूल्यांकनाचे काम जून महिन्यात सुरू करण्यात आले होते. दोन वर्षांच्या दागिन्यांचे मूल्यांकन पूर्ण झाल्यानंतर संस्थेने काम मध्येच थांबवले आहे. याबाबत अधिक माहिती घेतली असता संस्थेचे नियोजन सुरुवातीला ५ दिवसांचे होते, पण दागिन्यांची संख्या जास्त असल्याने दुसऱ्या टप्प्यात उरलेल्या दोन वर्षांतील दागिन्यांचे मूल्यांकन केले जाईल असे समजले. पुढील आठवड्यात संस्थेकडून नियोजनाचे पत्र येण्याची शक्यता आहे.
कोल्हापुरातील अंबाबाईच्या खजिन्यात दीड कोटीची भर, दागिन्यांचे मूल्यांकन मात्र मध्येच थांबले
By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2024 12:06 PM