समीर देशपांडेकोल्हापूर : तब्बल ३८ कोटी रूपयांची जादा पेन्शन खात्यात जमा झाल्याचा प्रकार कोल्हापूर जिल्ह्यात घडला. त्यामुळे आनंदलेले पेन्शनधारक बँकेमध्ये पोहोचले. परंतू तेथे मात्र एकाच महिन्याची पेन्शन काढण्यासाठी परवानगी देण्यात आल्याने अनेक ठिकाणी वादावादीचे प्रसंग उद्भवले.एसबीआयच्या निवृत्तीवेतन व्यवस्थापन पध्दतीच्या माध्यमातून ही रक्कम राज्यातील सर्व पेन्शनधारकांच्या खात्यामध्ये जमा केली जाते. कोल्हापूर येथील कोषागार कार्यालयाने १ एप्रिल रोजी पेन्शनधारकांची यादी आणि रक्कम निश्चित करून पाठवून दिली. तर १ तारखेला ही रक्कम ऑनलाईन अदा केली जात असताना कोल्हापूर जिल्ह्याची फाईल दोनदा पुश केली गेली. त्यामुळे जिल्ह्यातील १५५०० खातेधारकांच्या खात्यावर दुप्पट म्हणजे जिल्ह्यात ३८ कोटी रूपये जादा जमा झाले.हा मेसेज आल्यानंतर निवृत्तीवेतनधारकांनाही लक्षात आले नाही की दुप्पट पैसे कसे जमा झाले. त्यांनी सोमवारी बँक उघडल्याउघडल्या पेन्शन काढण्यासाठी धाव घेतली. परंतू २ एप्रिल रोजीच हे पैसे जादा जमा झाल्याचे लक्षात आल्याने एसबीआयला कळवण्यात आले होते. त्यामुळे बँकेने सोमवारी सकाळी जादा रक्कम काढण्यावर लॉक लावले होते. मात्र या सर्व प्रकारामुळे पेन्शनधारकांमध्ये संभ्रम निर्माण झाला.
(छाया - आदित्य वेल्हाळ)