कोल्हापूर : महायुतीतील शिंदेसेनेचे उमेदवार संजय मंडलिक यांनी शाहू छत्रपती घराण्याबाबत केलेल्या अवमानकारक वक्तव्याच्या निषेधाचे पडसाद अजूनही उमटत आहेत. कोल्हापुरातील ज्येष्ठ इतिहास संशोधक, अभ्यासक यांनीही शुक्रवारी त्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. हिंदू संस्कृती परंपरेनुसार औरस पुत्राइतकाच दत्तक पुत्रालाही अधिकार असल्याचा दावा त्यांनी केला.ज्येष्ठ इतिहास संशोधक प्रा. डॉ. जयसिंगराव पवार म्हणाले की, भारतीय हिंदू संस्कृती परंपरेनुसार औरस पुत्राइतकाच दत्तक पुत्रालाही अधिकार असतो. त्यामध्ये फरक केला जात नाही. शाहू महाराजांसाठी त्यांनी जर असा निकष लावला असेल तर राजर्षी शाहू महाराज हेदेखील दत्तकच होते. मग संजय मंडलिक त्यांनाही छत्रपतींच्या गादीचे वारस मानणार नाहीत का? बडोद्याचे सयाजीराव गायकवाड हेदेखील दुसऱ्या घराण्यातून दत्तक आले. पण आधुनिक, वैज्ञानिक आणि कर्तबगार असे ते देशातील एकमेव राजे बनले. हा इतिहास लक्षात घेतला पाहिजे.इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत म्हणाले की, भारतीय संस्कृतीमध्ये दत्तक प्रथा अतिशय प्राचीन असून छत्रपती घराण्यात शाहू महाराज हे पहिले दत्तक राजे होते. सर्वच दत्तक राजे पराक्रमी, शूर आणि कर्तृत्ववान होते. राजर्षी शाहू महाराज यांनी दत्तक आल्यानंतरच रयतेचे राज्य आणि समतेचा विचार दिला.
प्रा. रमेश जाधव म्हणाले की, समाज परंपरेत मातृसत्ताक आणि पितृसत्ताक अशा पद्धती आहेत. सध्याचे शाहू छत्रपती हे राजर्षी शाहू महाराजांचे मुलींच्या बाजूने विचार केला तर थेट वंशज आहेत. राजर्षी शाहू महाराजांच्या कन्या अक्कासाहेब महाराज यांच्या देवास घराण्यापासून नंतर नागपूरकर घराण्यातून थेट मुलीच्या बाजूने वंशज असलेले सध्याचे शाहू छत्रपती आहेत. हा संदर्भ लक्षात घेतला पाहिजे.