गडहिंग्लज: संतप्त गडहिंग्लजकरांनी तब्बल अर्धा तास अधिकाऱ्यांना बैठकीत कोंडून ठेवले. त्यामुळे त्यांना भाडोत्री जनरेटर आणून महामार्गावरील पथदिवे सुरू करावे लागले. ऐन गणेश चतुर्थीच्या पूर्वसंध्येला झालेल्या या अनोख्या आंदोलनाची शहरासह तालुक्यात जोरदार चर्चा सुरू आहे.गडहिंग्लज शहरातून गेलेल्या संकेश्वर बांदा महामार्गावर ९९ पथदिवे आणि ५ हायमास्ट दिवे बसवण्यात आले आहेत. परंतु, वीजजोडणी आणि वीज बिल भरण्याच्या मुद्यावरून महामार्ग प्राधिकरण व नगरपालिका यांच्यातील वादामुळे पथदिवे बंद आहेत. त्यामुळे सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर ही बैठक झाली. जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन याप्रश्नी कायमचा तोडगा काढण्याची मागणी आंदोलकांनी केली.प्रांताधिकारी एकनाथ काळबांडे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. महामार्ग प्राधिकरण उपअभियंता आर. बी. शिंदे, महावितरण उपकार्यकारी अभियंता राम सूर्यवंशी, मुख्याधिकारी संजय गायकवाड, पोलिस निरीक्षक गजानन सरगर यांची प्रमुख उपस्थिती होती.बैठकीत डॉ. नंदिनी बाभूळकर, स्वाती कोरी, बसवराज आजरी, नागेश चौगुले, राजेंद्र तारळे, प्रीतम कापसे, संजय संकपाळ, दिग्विजय कुराडे आदींनी आक्रमक भूमिका घेतली. आंदोलकांनी काही पर्याय सुचवले तरीदेखील पथदिव्यांची जबाबदारी घेण्यास प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी नकार दिला.किमान गणेशोत्सवात तात्पुरते दिवे सुरू करण्यासही त्यांनी नकार दिल्याने सर्व अधिकाऱ्यांना सभागृहात कोंडण्यात आले. त्यामुळे महामार्ग प्राधिकरणाने भाडोत्री जनरेटर आणून दसरा चौक ते गिजवणे ओढा दरम्यानचे पथदिवे रात्री उशिरा सुरू केले. संकेश्वर रोडवरील पथदिवे उद्या (शनिवारी) सुरू करण्यात येणार आहेत.
Kolhapur: गडहिंग्लजकरांनी अधिकाऱ्यांना कोंडले, अखेर पथदिवे जनरेटरवर सुरू झाले
By ऑनलाइन लोकमत | Published: September 07, 2024 12:54 PM