अनिल पाटील सरुड : निसर्ग अनुभव कार्यक्रम २०२३ अंतर्गत सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात उद्या शुक्रवार (ता. ५ ) रोजी बुद्ध पौर्णिमेच्या रात्री अभयारण्यातील पाणवठ्यावरील वन्य प्राणी गणना होणार आहे. निसर्ग व वन्यजीवप्रेमी स्वंयसेवकांच्या मदतीने ६० मचाणावरुन ही प्राणी गणना केली जाणार आहे. प्रत्येक मचाणावर एक निसर्गप्रेमी स्वंयसेवक व एक वनविभागाचा कर्मचारी असणार आहे. या मचाणावरून निसगीप्रेमी अरण्य वाचनाचा थरारक अनुभव घेणार आहेत. ५ जानेवारी २०१० रोजी सह्याद्री व्याघ्र प्रकल्प अस्तित्वात आला. सांगली, कोल्हापूर, सातारा व रत्नागिरी या चार जिल्ह्यांच्या हद्दीत सुमारे ११६५. ५७ चौ. कि मी मध्ये हा प्रकल्प आहे. या प्रकल्पात सस्तन प्राण्याच्या ३८, पक्षांच्या २४४, फुलपाखरांच्या १२०, उभयचर प्राण्यांच्या ४४, गोड्या पाण्यातील माशाच्या ५० प्रजाती तर वनस्पतीच्या १४५२ प्रजाती आढळून येतात. यामध्ये वाघ, गवा, बिबटे, साळींदर, रानडुक्कर, हनुमान वानर, पिसोरी, अस्वल, रानकुत्रे, सांबर, चौसिंगा, भारतीय ससा आदी प्राण्यांचा समावेश आहे.दरवर्षी निसर्गानुभव कार्यक्रमांतर्गत बुद्ध पोर्णिमेच्या रात्रीस अभयारण्यातील प्राण्यांची गणना केली जाते. त्यानुसार यावर्षी शुक्रवार दि ५ मे रोजी बुद्ध पोर्णीमेच्या लख्ख प्रकाशात ही प्राणी गणना होणार आहे. उन्हाळ्यामध्ये अभयारण्यातील बहुतांश पाणवठे कोरडे असतात त्यामुळे काही ठराविक पाणवठ्यावरच पाणीसाठा उपलब्ध असल्याने वन्य प्राणी या पाणवठ्यावर पाणी पिण्यासाठी गर्दी करतात. अशा पाणवठ्यावर लाकडी मचान बांधण्यात आली आहेत. त्यामुळे वन्य प्राण्यांचे स्पष्ट दर्शन होऊ शकते. ६० मचाणावरुन प्राणी गणना होणार सह्याद्री व्याघ्र प्रकल्पांतर्गत चांदोली राष्ट्रीय उद्यानासह व कोयना अभयारण्याचा समावेश होतो . चांदोली अभयारण्यातंर्गत चांदोली परिक्षेत्रातील १५, हेळवाक परिक्षेत्रातील ९ व ढेबेवाडी परिक्षेत्रातील ५, तर कोयना अभयारण्यातंर्गत कोयना परिक्षेत्रतील १५ व बामणोली परिक्षेत्रातील १६ अशा एकुण ६० मचाणावरुन ही प्राणी गणना होणार आहे. त्यानंतर या गणनेतील सर्व माहिती एकत्रित करून सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील प्राण्यांची संख्या निश्चित केली जाणार आहे . - नंदकुमार नलवडे, वनक्षेत्रपाल (वन्यजीव) चांदोली अभयारण्य
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात उद्या रात्री प्राणी गणना होणार, मचाणावरून निसर्गप्रेमी थरारक अनुभव घेणार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 04, 2023 5:53 PM