कोल्हापूर : निवृत्त कर्मचाऱ्यास सेवाकाळातील रजांचा मोबदला विनात्रुटी मंजूर करण्यासाठी २५ हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या आरोग्य उपसंचालक कार्यालयातील सहायक अधीक्षकासह तिघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई मंगळवारी (दि. ३०) सकाळी पारगाव (ता. हातकणंगले) येथील आरोग्य केंद्रात करण्यात आली. यात पारगाव आरोग्य केंद्रातील वाहनचालक आणि त्याच्या मुलाचा समावेश आहे.सहायक अधीक्षक मारुती परशुराम वरुटे (५०, सध्या रा. सुनंदा पार्क, पोतदार हायस्कूलजवळ, कोल्हापूर, मूळ रा. कासारपुतळे, ता. राधानगरी), पारगाव आरोग्य केंद्रातील वाहनचालक विलास जीवनराव शिंदे (५७) आणि खासगी एजंट शिवम विलास शिंदे (२२, दोघे सध्या रा. पारगाव, मूळ रा. किणी, ता. हातकणंगले) अशी अटकेतील संशयितांची नावे आहेत.लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक सरदार नाळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पारगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात औषध संशोधक पदावरून निवृत्त झालेल्या व्यक्तीने सेवाकाळातील रजांचा मोबदला मिळावा, यासाठी अर्ज केला होता. तो अर्ज मंजुरीसाठी कसबा बावडा येथील आरोग्य संचालक कार्यालयातील सहायक अधीक्षक मारुती वरुटे याच्याकडे पोहोचला. विनात्रुटी अर्ज मंंजूर करण्यासाठी वरुटे याने अर्जदाराकडे ३० हजार रुपये लाचेची मागणी केली.तडजोडीअंती २५ हजार रुपये देण्याचे ठरले. त्यानंतर अर्जदारांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार केली. उपअधीक्षक नाळे यांनी तक्रारीची खातरजमा करून मंगळवारी सकाळी पारगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सापळा रचला. सहायक अधीक्षक वरुटे याच्या सांगण्यानुसार लाचेची रक्कम स्वीकारणाऱ्या शिंदे पिता-पुत्रास पथकाने रंगेहाथ अटक केली. संशयितांच्या घरांचीही झडती घेण्यात आली. तिन्ही संशयितांवर कोडोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
एकाच तक्रारदाराकडून दोघांची शिकारया कारवाईतील तक्रारदार ३१ मे २०२२ ला मलकापूर ग्रामीण रुग्णालयातून निवृत्त झाले. तेव्हा मलकापुरातील तत्कालीन वैद्यकीय अधीक्षक डाॅ. आशुतोष तराळ कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी तक्रारदाराकडून लाच घेताना सापडले होते. वर्षभरात याच तक्रारदारांच्या तक्रारीमुळे सहायक अधीक्षक वरुटे एसबीच्या जाळ्यात अडकला.
वादग्रस्त कार्यालयइचलकरंजीतील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयातील ४२ कर्मचारी २८ महिने कामावर हजर नसतानाही संगनमताने साडेसहा कोटी रुपयांचे वेतन अदा केल्याचा आरोप मनसेने या कार्यालयातील अधिकाऱ्यांवर केला होता. त्याबाबत आंदोलनेही झाली आहेत.