कोल्हापूर : वीजमहावितरणसह विविध कंपन्यांनी वीज दरवाढीची मागणी केल्याने महाराष्ट्र राज्य विद्युत नियामक आयोगाने ४ रुपयांची दरवाढ प्रस्तावित केली आहे. वाढीव वीज दरवाढ १ एप्रिल २०२३ पासून लागू होणार आहे. प्रस्तावितप्रमाणे वीज दरवाढ लागू झाल्यास ग्राहकास एका युनिटला सरासरी ११ रुपये मोजावे लागतील, अशी माहिती महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष व वीज तज्ज्ञ प्रताप होगाडे यांनी दिली.राज्यात एकूण २ कोटी ९० लाख वीज ग्राहक आहेत. विविध वीज निर्मिती आणि वितरण कंपन्यांनी यंदाच्या वीज दरवाढीचा प्रस्ताव आयोगासमोर ठेवला आहे. यामुळे आता आहे, त्यामध्ये सरासरी ४ रुपये वीज दर वाढ होणार आहे. यामुळे एका युनिटला कमीत कमी दहा रुपयांवर पैसे मोजावे लागतील. ही वीज दरवाढ सामान्य, मध्यमवर्गीय वीज ग्राहकांना परवडणार नाही.
याचा औद्योगिकीकरणावर परिणाम होणार आहे. वीज प्रचंड महाग झाल्याने ग्राहकांचे आर्थिक गणित बिघडणार आहे. यामुळे राज्य सरकार, आयोग आणि वीज कंपन्यांनी ग्राहक हित व राज्याचा विकास नजरेसमोर ठेवून वीज दरवाढीसंबंधी निर्णय घ्यावा, अशी ग्राहकांची मागणी आहे.ई-सुनावणीमुळे आवाज पोहोचणार का ?वाढीव वीज दरवाढीवर वीज नियामक आयोग गेली २२ वर्षे जाहीर सुनावणी घेत होता. त्यावेळी राज्यातील हजारो वीज ग्राहक व शेकडो औद्योगिक, शेतकरी, व्यावसायिक व ग्राहक संघटना आपल्या हरकती व सूचना दाखल करीत होते. यावेळी आधी ऑनलाइन सूचना व हरकती दाखल कराव्या लागतील. ऑनलाइन ई-सुनावणीसाठी मागणी नोंद करून ई- सुनावणीत भाग घ्यावा लागेल. हे सर्वसामान्य ग्राहकांना शक्य नाही. यामुळे आयोगासमोर सर्वसामान्य वीज ग्राहकांचा आवाज कितपत पोहोचणार असाही प्रश्न उपस्थित होत आहे.