शिरोली : शिरोली ग्रामपंचायत पाणी पुरवठा कर्मचारी गोरखनाथ रामदास यादव याने काल, मंगळवारी स्वातंत्र्य दिनादिवशी ग्रामपंचायती समोर अंगावर रॉकेल ओतून घेऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्याठिकाणी असलेले पोलिस कर्मचाऱ्यांनी त्याला ताब्यात घेतले. यामुळे अनर्थ टळला. यावेळी गोरखची आई माझ्या पोरग्याला कामावर घ्या असे हंबरडा फोडून सांगत होती.पाणीपुरवठा कर्मचारी गोरख यादव याला गेल्या तीन महिन्यांपासून ग्रामपंचायतीने कोणतेही कारण न देता कामावरून काढून टाकले आहे. तसेच त्याला झाडू कामगार आणि गटार स्वच्छ करण्यासाठी तगादा लावला होता. गोरखनाथ यादव याची नेमणूक ही पाणीपुरवठा सुपरवायझर म्हणून आहे. तसेच तो कायमस्वरुपी कामगार आहे. गेल्या मे महिन्यापासून त्याला कामावरुन विनाकारण काढून टाकले. यादव याने मला कामावर घ्या अन्यथा स्वातंत्र दिनादिवशी ग्रामपंचायतसमोर आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. याबाबत जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद, शिरोली पोलीस ठाणे, हातकणंगले तहसीलदार यांना निवेदन दिले होते. १४ ऑगस्ट रोजी ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या मासिक बैठकीत ही गोरख यादवच्या विषयावर चर्चा झाली होती. यात ग्रामपंचायतीने काही झाले तरी त्याला कामावर घ्यायचे नाही असा निर्णय घेतला होता. १५ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता गोरख यादव हातात रॉकेलचे कॅन घेऊन ग्रामपंचायत चौकात आला होता. त्याने अंगावर रॉकेल ओतून घेतले तेवढ्यात पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. ग्रामपंचायतीच्यावतीने ग्रामविकास अधिकारी ए. वाय. कदम यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. यादव यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
Kolhapur: शिरोली ग्रामपंचायतीसमोर एका कर्मचाऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2023 12:47 PM