दुर्वा दळवी कोल्हापूर : अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास आता काहीच दिवसांचा अवधी आहे. त्याआधी सर्वत्र श्रीराम मंदिराच्या प्रतिकृती ही साकारल्या जात आहे. घरोघरी मंदिराच्या प्रतिकृतीचे पूजन करण्यात येणार आहे. याच सोहळ्याच्या निमित्ताने कोल्हापुरच्या गडहिंग्लज तालुक्यातील एका कलाकाराची कलाकृती देशवासीयांना भुरळ घालणारी ठरली आहे. गडहिंग्लज येथील कलाकार रवी शिंदे यांनी फोम शिटस वापरून 3 फूट उंचीच्या अयोध्येतील श्रीराम मंदिराची प्रतिकृती साकारली आहे. एक कलाकृती तयार करण्यासाठी पाच दिवसांचा अवधी लागतो. अयोध्येतील मूळ मंदिराप्रमाणे त्याचे नक्षीकाम केलेलं आहे. हुबेहूब अशी साकारलेली मंदिराची प्रतिकृती कोल्हापुरात विविध ठिकाणी अक्षता कलश पूजनाच्या वेळेस भक्तांसाठी ठेवली जात आहे. रवी यांनी साकारलेली ही कलाकृती आता देशभर पोहोचली असून त्यांना महाराष्ट्रासह झारखंड, राजस्थान, गुजरात, कर्नाटक आदी राज्यांतून प्रतिकृतीसाठी ऑर्डर मिळत आहेत. ही कलाकृती तयार करण्यासाठी रवी यांना त्यांच्या सहकाऱ्यांचे मोलाचे सहकार्य मिळत आहे. रवी हे गेल्या 13 वर्षांपासून कला क्षेत्रात काम करत आहेत. त्यांनी तयार केलेली मंदिराची प्रतिकृती श्रीराम भक्तांच्या पसंतीस उतरत आहे. त्यामुळे रवी यांनी तयार केलेल्या प्रतिकृती देशाच्या कानाकोपऱ्यात असणाऱ्या भक्तांपर्यंत पोहोच केल्या जात आहेत. रवी यांच्या कलेचा होणारा प्रसार पाहून त्यांचे कुटुंबीय अन् कोल्हापूरकर ही भारावून गेले आहेत. तसेच त्यांच्यावर कला क्षेत्रातून कौतुकाचा वर्षाव ही होत आहे.
अयोध्येतील श्रीराम मंदिर उद्घाटन सोहळ्याचे थेट प्रक्षेपण केले जाणार आहे. परंतु ज्या श्रीराम भक्तांना मंदिराचे दर्शन घ्यावयाचे प्रचंड इच्छा आहे पण ते शक्य नसल्याने मी घडवलेली प्रतिकृती पाहून दर्शन घेऊ शकता. - रवि शिंदे, कलाकार