कोल्हापुरातील सिनेमाप्रेमी धनंजय कुरणे यांनी दोन दिवसांपूर्वीच त्यांच्या वाढदिवसानिमित्त एक प्रसंग फेसबुकवर शेअर केला होता. त्यात त्यांच्या 'हिंदी सिनेमातील प्रवेश' कसा झाला याबद्दल १९६० च्या आसपासची एक घटना सांगितली होती.
रमेश देव, सीमा, शरद तळवळकर इ. मंडळी एका सिनेमाच्या शूटिंगसाठी रत्नागिरीला गेली होती. शूटिंग आटोपून कोल्हापूरला परतताना, वाटेत त्यांची कार पंक्चर झाली. त्या काळात 'पंक्चर' काढणे ही आजच्याइतकी सुटसुटीत गोष्ट नव्हती. बराच वेळ रस्त्यावर थांबावं लागणार होतं.. समोरच एक छोटं टपरीवजा हॉटेल होतं. स्वाभाविकच ही मंडळी चहा प्यायला गेली....कोकणातल्या लाल मातीनं कपडे मळलेले.. दिवसभर उन्हात शूटिंग करून चेहरे घामेजलेले.. सगळ्यांचे अगदी 'अवतार दिसत होते..हॉटेलात चहाच्या ग्लासचे दोन प्रकार होते.. 'काचेचे आणि ॲल्युमिनियम'चे! हॉटेलवाल्याने यांच्या अवताराकडे पाहून ॲल्युमिनियमच्या पेल्यातून चहा दिला तेव्हा रमेशजींनी विचारलं.. "काचेच्या ग्लासातून चहा का दिला नाही?" "ते ग्लास 'मोठ्या' लोकांसाठी असतात.. 'तुमच्यासाठी' हेच योग्य आहेत!"...हॉटेलवाला फारच फटकळ असावा.
शरद तळवळकर समजुतीच्या स्वरात म्हणाले.. "आम्ही साधीसुधी माणसं नाही.. आम्ही मराठी सिनेमातले नट आहोत." हॉटेलवाल्यानं सगळ्यांना आपादमस्तक न्याहाळलं.."तुम्ही...?... आणि नट?... अहो नट कसे असतात ते बघा जरा.." असं म्हणून त्यानं हॉटेलच्या भिंतीवरची दिलीपकुमार, वैजयंतीमाला, राजकपूर वगैरेंची पोस्टर दाखवली. ॲल्युमिनियमच्या भांड्यातला चहा पिऊन ही मंडळी 'गपगुमान' बाहेर पडली..
रमेशजींच्या मनात विचार आला.. इतक्या मराठी चित्रपटांमधे कामं करुन, आपल्या गावापासून फक्त ८० किलोमीटरवर असलेल्या या खेड्यात आपल्याला कुणी ओळखत नाही पण हा दिलीपकुमार पेशावरहून मुंबईत आला, वैजयंतीमाला दक्षिणेतून आली.. यांना मात्र अख्खा देश ओळखतो... कारण एकच... 'हिंदी सिनेमा!'आपणही हिंदीत जायचं आणि नाव कमवायचं.. निर्णय पक्का झाला. रमेशजींनी आपलं बस्तान मुंबईत हलवलं.. आणि १९६१ पासून हिंदी सिनेक्षेत्रात प्रवेश करुन उत्तम नाव कमावलं... २५० हून अधिक चित्रपट.. विविधरंगी भूमिका.. कधी खलनायक तर कधी चरित्र अभिनेता.. नाव सर्वदूर पोहोचलं.. एका 'पंक्चर' कारमुळे कारकीर्दीची गाडी वेगळ्या दिशेनं धावू लागली... एका फटकळ हॉटेलवाल्यामुळे हिंदी सिनेमाला एक उमदा अभिनेता मिळाला.