कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा नेते रविकांत तुपकर यांना १५ ऑगस्टपर्यंत शिस्तपालन समितीसमोर येऊन बाजू मांडण्याची संधी देण्यात आली. पक्षाच्या शिस्तपालन समितीची बैठक मंगळवारी पुण्यात झाली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. स्वाभिमानीचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी याची माहिती प्रसारमाध्यमांना दिली. गेल्या काही दिवसांपासून रविकांत तुपकर हे पक्षनेतृत्वावर उघडपणे नाराजी व्यक्त करत आहेत. त्यामुळे पक्षातील अंतर्गत वाद मिटवण्यासाठी स्वाभिमानीच्या शिस्तपालन समितीने मंगळवारी बैठक बोलावली होती. या बैठकीला रविकांत तुपकर यांना उपस्थित राहण्यास सांगितले होते. मात्र, तुपकर बैठकीकडे फिरकले नाहीत. त्यामुळे शिस्तपालन समितीने त्यांना १५ ऑगस्टपर्यंत म्हणणे मांडण्याची संधी दिली आहे. जर या मुदतीत तुपकर यांनी त्यांची बाजू मांडली नाही तर पक्ष पुढील निर्णय घेणार असल्याचे समितीच्यावतीने सांगण्यात आले.बाहेर पडण्याच्या निव्वळ अफवापुण्यातील बैठकीत काय निर्णय झाला याची माहिती मला नाही, म्हणणे मांडण्याचा निरोप पक्षाच्या कार्यालयाकडून आलेला नाही. असा काही निरोप आला तर पाहू. पण, मी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतच राहणार आहे, पक्ष सोडण्याच्या या निव्वळ अफवा असल्याचे स्पष्टीकरण रविकांत तुपकर यांनी 'लोकमत'शी बोलताना दिले. मी माझे म्हणणे गेल्या पाच वर्षांपासून राजू शेट्टी यांच्याजवळ मांडत आलो आहे. शिस्तपालन समितीचे अध्यक्ष प्रा. पोपळे, सावकार मादनाईक यांच्याशीही माझ्या तक्रारी मी मांडल्या असल्याचे तुपकर यांनी सांगितले.
रविकांत तुपकर यांना १५ ऑगस्टपर्यंत मुदत, स्वाभिमानीची पुण्यात झाली बैठक; तुपकर म्हणाले..
By ऑनलाइन लोकमत | Published: August 09, 2023 2:20 PM