कोल्हापूर : बेळगाव येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि विचारवंत प्रा. आनंद मेणसे यांना यावर्षीचा ‘भाई माधवराव बागल पुरस्कार’ यांना मंगळवारी जाहीर झाला. या पुरस्काराचे यंदाचे २५ वे वर्ष आहे. कोल्हापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. मल्लिनाथ कल्लशेट्टी यांच्या हस्ते मंगळवारी (दि. २८ मे) सायंकाळी साडेपाच वाजता राजर्षी शाहू स्मारक भवनमध्ये पुरस्कार वितरण होणार असल्याचे बागल विद्यापीठाचे अध्यक्ष अॅड. अशोकराव साळोखे आणि कार्याध्यक्ष प्राचार्य डॉ. टी. एस. पाटील आणि यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली.अॅड. साळोखे म्हणाले, कम्युनिस्ट चळवळीतील कार्यकर्ते असणाऱ्या प्रा. आनंद मेणसे यांचा बेळगाव आणि खानापूर तालुक्यातील अंगणवाडी महिला कर्मचाऱ्यांची संघटना स्थापन करण्यात पुढाकार होता. या संघटनेचे अनेक वर्ष कार्यवाह म्हणून काम पाहिले. मराठी विद्यानिकेतन ही शाळा स्थापन करण्यात त्यांचा सहभाग होता. रवळनाथ हौसिंग फायनान्स को-आॅप. सोसायटीच्या बेळगाव शाखेचे चेअरमन, दि. बेळगाव सिटी मजदूर को-आॅप सोसायटीचे संचालक म्हणून त्यांनी काम पाहिले आहे.
अन्नपूर्णा महिला मंडळाची त्यांनी स्थापना केली. बेळगाव सार्वजनिक वाचनालयाच्या अध्यक्ष, तर कॉ. कृष्णा मेणसे पुरोगामी व्यासपीठाच्या खजिनदाराची त्यांनी जबाबदारी सांभाळली. पत्रकारिता त्यांनी केली. विविध दहा पुस्तके त्यांनी लिहिली आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन यावर्षीच्या ‘भाई माधवराव बागल’ पुरस्काराने प्रा. मेणसे यांना गौरविले जाणार आहे.
शाल, गौरवपत्र, स्मृतिचिन्ह व पाच हजार रुपये असे पुरस्काराचे स्वरूप आहे. प्राचार्य पाटील म्हणाले, ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी भाई माधवराव बागल यांच्या १२३ व्या जयंतीनिमित्त मंगळवारी सकाळी साडेनऊ वाजता स्मृती अभिवादन समारंभ आयोजित केला आहे. छत्रपती राजर्षी शाहू मिलसमोरील भाई बागल यांच्या पुतळ्याच्या परिसरात हा अभिवादनाचा कार्यक्रम होणार आहे. या पत्रकार परिषदेस चंद्रकांत यादव, व्यंकाप्पा भोसले, संभाजीराव जगदाळे, आदी उपस्थित होते.