आॅनलाईन लोकमतकोल्हापूर, दि. २६ : सोशल माध्यमातून मिळणारा आनंद हा क्षणभंगुर असतो. पण खरा आनंद हा पुस्तकातुनच मिळतो. कारण त्यातुन मिळणारा आनंद हा चिरकाल टिकणारा असतो. असे प्रतिपादन जेष्ठ साहित्यिक प्रा.डॉ.चंद्रकुमार नलगे यांनी केले.
जागतिक वाचन दिनाचे औचित्य साधत आरळे (ता.पन्हाळा) येथील प्राथमिक शाळेत वाचनकट्टयातर्फे आयोजित ‘पुस्तकबन’या उपक्रमाचे आयोजन केले होते. त्या प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष आनंदराव घाटगे होते.
वाचनकट्टा बहुउद्देशिय संस्थेने वाचन संस्कृती जोपासता यावी यासाठी पुस्तकबन ही आगळी वेगळी संकल्पना राबिवली. यात केंद्रशाळा आसुर्ले, कन्या विद्यामंदिर पोर्ले, विद्यामंदिर आवळी व गजानन विद्यालय आरळे या चार शाळेच्या दोनशे मुलांनी सहभाग घेतला होता. यात कविकट्टा,मला भावलेले पुस्तक,पालक कट्टा असे उपक्रम घेण्यात आले होते. मुलांच्यात पुस्तक प्रेम वाढावे, त्यांना लिहण्याची प्रेरणा मिळावी, वाचलेल्या पुस्तकावर त्यांनी बोलते व्हावे, पालकांशी हितगुज करुन त्यांना वाचन चळवळीचे महत्व सांगुन मुलांच्यावर पालकांनी वाचन संस्कार करावे अशा विविध उद्देशाने या पुस्तकबनाचे आयोजन केले होते.
मला भावलेले पुस्तक या कट्टयावर मुलांनी विविध विषयांवरची वीस पुस्तके मांडलीत. तर कवि कट्टयावर बालकविंनी लिहलेल्या कवितांनी रसिकांची वाहवा मिळवली.
याप्रसंगी प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंगचे संचालक प्रा.विनय पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. वाचन कट्याचे अध्यक्ष युवराज कदम, वाचन कट्ट्याचे मुख्य समन्वयक प्रा.टी.के सरगर, प्रकाश ठाणेकर, विजय एकसिंगे, सयाजी पाटील, अर्चना पाटील, वैदेही जोशी, डॉ. संदिप शिंदे, निखिल कुंभार, दिपक परीट, करवीर नगर वाचन मंदिरच्या ग्रंथपाल मनिषा शेणई, वृषाली तोरस्कर यांच्यासह शिक्षक,कर्मचारी,विद्यार्थी,पालक मोठया संख्येने उपस्थित होते.