कोल्हापूर : दुर्गम भागात शिक्षणाची गंगोत्री पोहोचवण्याचे काम शासनाने केले असले तरी या ‘गंगोत्री’ने तेथील परिसर शैक्षणिकदृष्ट्या ‘सुजलाम सुफलाम’ झाला पाहिजे, या ध्येयाने गेली २७ वर्षे अक्षरश: झपाटल्यासारखे काम सांगरूळ (ता. करवीर) येथील आनंदराव दिनकर नाळे करत आहेत. राधानगरी तालुक्यातील पात्रेवाडी या दुर्गम शाळेचे रुपडे पालटण्याचा विडा त्यांनी उचलला असून, ही शाळा राज्यातील मॉडेल करण्यासाठी त्यांनी सुरू केलेली धडपड आजच्या शिक्षण व्यवस्थेसमोर आदर्शवत आहे.आनंदराव नाळे यांनी १९९६ ला डी. एड. झाल्यानंतर पन्हाळा तालुक्यातील पणुत्रे येथे सेवेला सुरुवात केली. येथील पालक गरीब शेतकरी, मजूर असल्याने येथील मुलांना शिक्षणाची गोडी लावण्याचे आव्हान नाळे यांनी पेलत पटसंख्या वाढवत शैक्षणिक दर्जा सुधारला. शाळेच्या भौतिक सुधारणांकडे लक्ष देत विद्युत रोषणाईसह बाग विकसित करत तरुण मंडळे, दानशूर व्यक्तींना सोबत घेऊन शाळेचे रुपडेच पालटले. हे करत असताना चार-चार महिने ते घरीच येत नव्हते. वर्षातून दोन वेळा शाळा धुऊन काढत. मल्लखांब, जिम्नॅस्टिकच्या माध्यमातून शाळेचे नाव राष्ट्रीय पातळीपर्यंत नेले. पडळ येथे बदली झाल्यानंतर शाळा मॉडेल करत शिष्यवृत्ती, प्रज्ञाशोध, विज्ञानप्रदर्शनच्या माध्यमातून जिल्हास्तरावर शाळेचा दबदबा निर्माण केला. २२ वर्षे दुर्गम भागात सेवा केल्यानंतर त्यांना शहराशेजारील शाळा मिळू शकली असती, पण दुर्गम भागात बदलीची विनंती करत राधानगरीचे शेवटचे टोक पात्रेवाडी गाव निवडले.
जेमतेम ३५ कुटुंबाचे गाव, त्यात शाळा अर्धा किलोमीटर लांब, त्यामुळे मुलांची उपस्थितीही जेमतेमच, नाळे यांनी प्रत्येक कुटुंबापर्यंत जाऊन मुलांना शाळेत आणून त्यांच्यामध्ये शिक्षणाची गोडी निर्माण केली; पण पावसाळ्यात ओढ्याला पाणी आले की दीड-दोन महिने मुले यायची नाहीत. यासाठी गावकऱ्यांच्या सहकार्यातून त्यांनी ओढ्यावर लहान पूल उभारून रस्ता केला. शाळेभोवती संरक्षक भिंत, शाळेपर्यंत डांबरी रस्ता व कमान उभी करून शाळेचा चेहरामोहरा बदलण्यास सुरुवात केली आहे. येथे बिनभिंतीची शाळा उभारण्याचा त्यांचा संकल्प आहे.बदलीसाठी ग्रामदैवताला साकडेनाळे यांनी सोळा वर्षे पणुत्रे शाळेत सेवा केल्यानंतर त्यांची बदली झाली, ती थांबवण्यासाठी शिक्षण विभागापर्यंत प्रयत्न झाले. शेवटी ग्रामदैवताला कौल लावून साकडे घातले, इतके प्रेम त्यांनी मिळवले होते.