एकनाथ पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : मैत्री आणि ग्रुपच्या सहवासातून अनेक शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थी व्यसनाच्या आहारी गेली आहेत. व्यसन, टीव्ही, चित्रपट, मोबाईलच्या परिणामामुळे ही मुले विकृत बुद्धीतून खून, अत्याचार, आत्महत्या, असे गंभीर गुन्हे करण्याकडे वळत आहेत. त्यामध्ये चौदा ते अठरा वर्षांपर्यंतच्या मुलांचा गुन्ह्यात सहभाग दिसत आहे. या घटनांमुळे पालकांसह पोलिसांची डोकेदुखीही वाढली आहे.
शाळेमध्ये मित्राचा मोबाईल पाहून आई-वडिलांकडे त्याचा हट्ट. परिस्थिती नसतानाही सायकल, मोटारसायकल, किमती कपडे यासाठी मुले हट्टी बनत आहेत. आई-वडिलांनी त्याला विरोध करीत परिस्थितीची जाणीव करून देण्याचा प्रयत्न केला, तर त्याचेही त्यांना वावडे वाटते. वाढत्या हव्यासापोटी अखेर चोरी करण्याकडे त्यांचे पाय वळतात. शालेय मुलांकडून मोबाईल, मोटारसायकल चोरी असे प्रकार घडत आहेत. शास्त्रीनगरमध्ये बालगुन्हेगाराने महिलेचा खून केल्याने जिल्हा हादरला आहे. अनेक मुले व्यसनांच्या आहारी गेली असून, ही मुले दागिने, पैसे चोरून आपली तल्लफ भागवत असतात. मुलांच्या हातून घडलेल्या अशा घटनेमुळे आई-वडील, नातेवाइकांना धक्का बसतो; परंतु त्यांना सुधारण्याची, बाहेर काढण्याची वेळ निघून गेलेली असते. म्हणून मुले घराबाहेर काय करतात, त्यावरलक्ष ठेवणे ही पालकांची जबाबदारी आहे.बालगुन्हेगारांचे वाढते प्रमाण ही धोक्याची घंटा आहे. त्यांना वेळीच रोखणे यासाठी पालकांनी जागरूक राहिले पाहिजे. शाळा-महाविद्यालयांत त्यांचे प्रबोधन करणे ही काळाची गरज आहे. महाविद्यालयाच्या परिसरात अमली पदार्थांची विक्री होत असेल तर संबंधितांवर कारवाई केली जाईल.- डॉ. प्रशांत अमृतकर, शहर पोलीस उपअधीक्षकबालगुन्हेगाराला ‘विधिसंघर्ष बालक’ म्हणून पोलीस ताब्यात घेतात. त्याला पोलीस कोठडीत ठेवता येत नसल्याने त्याच्या आई-वडिलांना बोलावून त्याला समज दिली जाते. त्याला सुधारण्याची हमी दिली, तर त्याला त्यांच्या ताब्यात दिले जाते. बालगुन्हेगाराच्या गुन्ह्यांची व्याप्ती पाहून त्यांची रवानगी बालसुधारगृहात केली जाते. फोटोला विरोध केल्याने महिलेचा खून, राधानगरी येथे वडिलांचा खून, राजारामपुरी परिसरात चैनीसाठी मोबाईल व मोटारसायकलींची चोरी अशा गंभीर घटना जिल्ह्यात घडल्या आहेत. बालगुन्हेगारांमध्ये कायद्याची भीतीच राहिलेली नाही. गंभीर गुन्हा करूनही हे बालगुन्हेगार बाहेर समाजात वावरत असतात. त्यामुळे अशा गुन्हेगारांच्या कृत्यांमुळे पालक व पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे.