गारगोटी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यात वसलेला एक दुर्लक्षित किल्ला म्हणजे किल्ले सोनगड. समुद्रसपाटीपासून ३५० मीटर उंचीवर वसलेला हा किल्ला, याच्या माथ्याकडील कातळटोपीमुळे आपले लक्ष वेधून घेतो. या गडाच्या दरीत सुमारे १५०० फुटांवर किर्र जंगलात अनेक वर्षांपासून पडून असलेली एक तोफ शोधण्यात खानापूर ( ता. भुदरगड) येथील संघर्ष ग्रुप व मावळा प्रतिष्ठान, कोल्हापूरच्या युवकांना यश आले आहे. या युवकांनी गर्द झाडीतील मळलेल्या पायवाटेने ओबडधोबड कातळ कोरीव पायऱ्या चढून गडमाथा गाठला. तोफेचा शोध घेण्यासाठी हे मोजकेच मावळे दरीत उतरले. ही दरी दाट झाडीने व्यापली आहे. मात्र धाडस करत युवकांनी ही तोफ शोधून काढली. संघर्ष ग्रुप व मावळा प्रतिष्ठानच्या सदस्यांनी २४ एप्रिलला शोधमोहीम हाती घेतली व अवघ्या दोन दिवसांच्या मोहिमेत ही तोफ शोधून काढली.
या मोहिमेत दिलीप गुरव, वामन गुरव, किरण पाटील, कांतिभाई पटेल, प्रवीण तावडे, नील पटेल यांच्यासह मावळा प्रतिष्ठानचे सदस्य सहभागी झाले होते.
चौकट : अशी झाली शोधमोहिमेस सुरुवात
गारगोटीचे वनरक्षक किरण पाटील यांनी सोनगडच्या दरीत तोफ असल्याची माहिती कांतिभाई पटेल व प्रवीण तावडे यांना दिली. या दोन मावळ्यांनी २४ एप्रिलला या गडाच्या दरीत उतरून अथक् प्रयत्नांनी या तोफेचा शोध घेतला. दरीमधून तोफ बाहेर काढण्यासाठी जागेची पाहणी केली व २८ एप्रिल रोजी प्रत्यक्ष तोफ बाहेर काढण्यास सुरुवात केली. काही दिवसांत ही तोफ मोठ्या दिमाखात गडमाथ्यावर आणली जाईल.
फोटो ओळ:
२८ एप्रिल रोजी दरीतून तोफ बाहेर काढताना संघर्ष ग्रुप व मावळा प्रतिष्ठानचे मावळे.