म्हाकवे : पुरात वाहून गेलेल्या म्हाकवे (ता. कागल) येथील सचिन जयराम पाटील या तरुणाच्या कुटुंबीयांचे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी भेट देऊन सांत्वन केले. १५ वर्षांपूर्वीच मातृ-पितृछत्र हरविलेल्या आणि कुंटुंबीयांची जबाबदारी असणाऱ्या सचिनवर काळाने घाला घातला. कुटुंबीयांनी चिमुकल्या शिवन्याचे काय होणार? असे म्हणत हंबरडा फोडला. यावेळी मुश्रीफ यांनाही गहिवरून आले. त्यांनी कुटुंबीयांना धीर दिला. यावेळी नोकरीत असलेल्या रेमंड कंपनीसह, शेतकरी अपघात विमा, केडीसीसी बँकेचा सभासद अपघात विमा यासह मुश्रीफ फाउंडेशनच्या वतीने एक लाख रुपये तातडीची मदत जाहीर केली, तसेच सचिन यांची मुलगी शिवन्याच्या उच्चशिक्षणापर्यंतची जबाबदारीही मंत्री मुश्रीफ यांनी स्वीकारत मदतीचा हात पुढे केला.
दोन दिवसांपूर्वी ओढ्यावरून वाहून गेलेल्या सचिन जयराम पाटील (वय ३०) याचा आज सकाळी उसाच्या शेतात मृतदेह सापडला. तो कागल पंचतारांकित वसाहतीतील रेमंड कंपनीत नोकरीला होता. हे कुटुंब उघड्यावर पडू नये यासाठी ना. मुश्रीफ यांनी तात्काळ मदतीचा हात पुढे केला.
यावेळी तहसीलदार शिल्पा ठोकडे, गटविकास अधिकारी सुनील संसारे, ‘बिद्री’चे संचालक प्रवीणसिंह भोसले, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष शिवानंद माळी, माजी पं.स. सदस्य ए.वाय. पाटील, सरपंच सुनीता चौगुले, उपसरपंच धनंजय पाटील, रमेश पाटील, सिद्राम गंगाधरे, हिंदूराव पाटील, रामचंद्र पाटील, आकाराम पाटील, डॉ. विजय चौगुले, दिनेश पाटील, रघुनाथ पाटील, जीवन कांबळे, सीताराम गोरे, अमित पाटील आदी उपस्थित होते.
दरम्यान, येथील पूरपरिस्थितीची पाहणी करून हसन मुश्रीफ फाउंडेशनच्या वतीने पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले.
कॅप्शन
म्हाकवे येथील पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या सचिन पाटील या तरुणाच्या कुटुंबीयांचे सांत्वन ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.
२४ म्हाकवे मुश्रीफ