लोकमत न्यूज नेटवर्ककसबा बावडा : करवीर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये एकूण ७२ शिक्षक कमी आहेत. गेले वर्षभर तालुक्यातील शाळांना शिक्षक द्या, अशी मागणी केली. परंतु, जिल्हा परिषदेने याकडे दुर्लक्ष केले. येत्या शैक्षणिक सत्र सुरूहोण्यापूर्वी या शाळांत शिक्षकांची नियुक्ती न केल्यास पहिल्या दिवसांपासून तालुक्यातील सर्व शाळा बेमुदत बंद केल्या जातील, असा इशारा करवीर पंचायत समिती सदस्यांनी मासिक सभेत दिला. तसा ठराव करण्यात आला. राजेंद्र सूर्यवंशी यांनी हा ठराव मांडला. सभेच्या अध्यक्षस्थानी सभापती प्रदीप झांबरे होते. करवीरमध्ये १८३ शाळा आहेत, तर एकूण शिक्षकांची संख्या १८६४ आहे. तालुक्यातील बहुतेक सर्व शाळेत विद्यार्थ्यांची संख्याही चांगली आहे. परंतु, ७२ शिक्षकांची कमतरता आहे. काही ठिकाणी तर केवळ दोन शिक्षक आहेत. जेव्हा एखादा शिक्षक कामानिमित्त तालुक्याच्या ठिकाणी गेले तर त्यावेळी एका शिक्षकाला संपूर्ण शाळा सांभाळावी लागते. सदस्यांच्या या प्रश्नाच्या भडिमारावर शिक्षण अधिकारी आर. जी. चौगले यांनी याबाबत वरिष्ठांना कळवितो, असे सांगितले. गांधीनगरला प्लास्टिकचा विळखा पडला असून, दिवसेंदिवस प्लास्टिकची समस्या वाढतच चालली आहे. त्यामुळे संपूर्ण गांधीनगरसह तालुका प्लास्टिकमुक्त करण्याचा ठराव खुद्द सभापती प्रदीप झांबरे यांनी मांडला. त्याला सर्व सदस्यांनी संमती दिली. जनजागृतीसाठी गटविकास अधिकारी राजेंद्र भालेराव तसेच उपसभापती विजय भोसले यांनी याबाबतचे आदेश सर्व ग्रामपंचायतींना त्वरित काढले जातील, असे स्पष्ट केले. पं.स.मार्फत करवीरमध्ये अनेक ठिकाणी विकासकामे सुरू आहेत. परंतु, कॉन्ट्रॅक्टर मनासारखे आणि दर्जेदार काम करीत नाहीत. काम न करता दिवसेंदिवस ते गबर होत चालले आहेत, असा आरोप सुनील पोवार यांनी केला. कॉन्ट्रॅक्टर केवळ पांढरा शर्ट घालून रुबाब मारतात. अशा कॉन्ट्रॅक्टरच्या कामाचं आॅडिट झाले पाहिजे, अशी मागणीही पोवार यांनी केली. सभेत शाळा गळतीचा विषयही चांगलाच गाजला. तालुक्यातील किती शाळांना गळती लागली आहे, तसेच त्यांच्या दुरुस्तीसाठी नेमके काय प्रयत्न सुरूआहेत, असा प्रश्न राजेंद्र सूर्यवंशी व सभापती प्रदीप झांबरे यांनी प्रशासनाला विचारला. यावर गटशिक्षण अधिकारी चौगले यांनी संबंधितांना प्रस्ताव पाठविला असल्याचे सांगितले. सभेत इंद्रजित पाटील, सरिता कटेजा, मोहन पाटील, मालिनी पाटील, रमेश चौगुले, अश्विनी धोत्रे, चंद्रकांत पाटील, यशोदा पाटील, अर्चना खाडे, आदींनी चर्चेत भाग घेतला. उपसभापती विजय भोसले यांनी आभार मानले. जिल्हा परिषदेच्याशाळेत मुले घाला जिल्हा परिषदेच्या शाळेतच सदस्यांनी तसेच अधिकाऱ्यांनी आपली मुले तसेच नातवंडे घालावी, असे आवाहन सभापती प्रदीप झांबरे यांनी केले. त्यावेळी अनेक सदस्यांनी आपली मुले जिल्हा परिषद शाळेतच शिकतात, असे हसत उत्तर दिले.पीरवाडीचा साकवतालुक्यातील पीरवाडी येथे साकव बांधण्याचे काम गेली दोन वर्षे सुरूआहे. मध्यंतरी त्याचे उद्घाटनही झाले; मात्र साकव अद्याप पूर्ण नाही. येत्या पावसाळ्यात साकवच्या दोन्ही बाजूकडील माती वाहून जाईल. त्यामुळे त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी अश्विनी धोत्रे यांनी केली.
..तर पहिल्या दिवसापासून शाळा बेमुदत बंद
By admin | Published: May 18, 2017 1:07 AM